दारू आणि कारसह ३३,६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त; पती – पत्नीवर गुन्हा दाखल
मालवण : (प्रतिनिधी) मालवण पोलिसांना मिळालेल्या गुप माहितीच्या आधारे काल रविवारी रात्री गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारी अल्टो (एमएच ०३ एआर २१५८) ही कार हडी येथे कालावल पुलानजीक पोलिसांनी पकडत ३३,६०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा कारसह जप्त केला आहे. याप्रकरणी देवगड येथील पती- पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्टो कार मधून अवैधपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मालवण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीसानी काल रात्री मालवण आचरा मार्गावर कालावल पुलनजीक सापळा रचला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सदर अल्टो कार या मार्गावरून कालावल पुलानजीक आली असता पोलिसांची चाहूल लागल्याने गाडी चालकाने गाडी आड रस्त्याला वळवली. यावेळी पोलिसांनी कारचा पाठलाग केला. मात्र आड वळणाचा रस्ता पुढे संपल्याने कारचालकाला पळून जाण्यास संधी न मिळाल्याने पोलिसांनी ही कार पकडत ताब्यात घेतली. यावेळी गाडीत ३३,६०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा सापडून आला. कार व दारूसाठा पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी अल्टो कार मधील योगेश विलास मयेकर व त्याची पत्नी नेहा योगेश मयेकर (रा. पोयरे- मसवी, देवगड) यांच्यावर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, भारत फारणे, पेडणेकर, पाटील व महिला पोलीस ओरसकर यांच्या पथकाने केली. फोटो : मालवण पोलिसांनी दारू वाहतूक प्रकरणी जप्त केलेली कार. (छाया- भूषण मेतर)
