अंधश्रद्धेला बळी न पडता चमत्कारामागील विज्ञान जाणून घ्या – नंदकिशोर तळाशीलकर

*⚡मालवण ता.२७-:* अनेक प्रकारचे बुवा, मांत्रिक बाबा हातचलाखीद्वारे चमत्कार दाखवून सामान्य माणसांच्या भोळेपणाचा फायदा घेत लुबाडत असतात. हे कोणतेही चमत्कार नसून त्यामागे विज्ञान दडलेले असते. अंधश्रद्धेला बळी न पडता चमत्कारामागील विज्ञानाचे प्रयोग आपण जाणून घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नंदकिशोर तळाशीलकर यांनी मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये चमत्कारामागील विज्ञान हा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नंदकिशोर तळाशीलकर यांनी विज्ञानातील विविध प्रयोग दाखवत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले आदी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी नंदकिशोर तळाशीलकर म्हणाले, सामान्य माणसांमध्ये अनेक अंधश्रध्दावर विश्वास ठेवला जातो. याचा फायदा घेऊन हातचलाखी द्वारे आणि विज्ञानातील प्रयोगांचा आधार घेत लोकांना मूर्ख बनवले जाते. चमत्कार दाखवून लोकांना लुटले जाते. बाबा व मांत्रिक विज्ञानातील प्रयोगांचा आधार घेऊनच एखाद्याची नजर काढल्याचे भासवून फसवतात. गाडीला लिंबू मिरची लावून कधी अपघात टाळता येत नाही. अपघात हे मानवनिर्मित अथवा यांत्रिक बिघाडामुळे होतात. मूर्ख न बनता आपल्या डोक्यात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, आपल्याला दाखविल्या जाणाऱ्या चमत्काराचे निरीक्षण करा, त्यामागील कारणे व विज्ञान जाणून घ्या, असेही तळाशीलकर म्हणाले.

You cannot copy content of this page