तात्काळ प्रवेश रद्द करा अन्यथा आंदोलन;भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा
सावंतवाडी : नवोदय विद्यालय सांगेली मध्ये यावर्षी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेश तात्काळ रद्द करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. तर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी देण्यात आलेल्या दाखल्यांमागे रॅकेट असून यात शासकीय यंत्रणा सामिल असल्याचा आरोप संजू परब यांनी केला आहे. दरम्यान, शहरी भागातील ३० टक्के मुलांची भरती करणे आवश्यक असताना शहरातील केवळ एकच विद्यार्थी निवडला गेला आहे. शहरातील यश मडवळ या विद्यार्थ्यांला ९७ टक्के गुण असताना देखील त्याला प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय सहन करणार नसून तात्काळ यावर्षी देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्यात यावेत. तर प्रसंगी जिल्हा परिषदच्या विरोधात सुद्धा आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी डॉ.सतीश सावंत, विनोद सावंत, यश मडवळ, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
