उपसंचालक हनुमंत हेडे
*⚡मालवण ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला खास पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता आहे. येथील पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना मूलभूत सेवा सुविधा देतानाच शासन निकषाप्रमाणे पर्यटन प्रकल्पांची उभारणी करावी. निवास न्याहारी, हॉटेल्स, रिसॉर्ट व कृषी पर्यटन केंद्र आदी पर्यटन प्रकल्पांची नोंदणी करणे गरजेचे असून या नोंदणीमुळे अनेक लाभ व्यावसायिकांना मिळणार आहेत. पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी तसेच व्यवसायात येणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पर्यटन संचालनालय नेहमीच सहकार्य करेल असे प्रतिपादन पर्यटन प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी मालवण येथे पर्यटन व्यावसायिकांच्या कार्यशाळेत बोलताना केले. पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ यांच्यावतीने मालवण येथील चिवला बीच हॉटेल येथे पर्यटन कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी व्यासपीठावर पर्यटन प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई चे उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन संचालनालयाचे पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडोळे यांच्यासह सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, मालवण शहरअध्यक्ष मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, निसर्ग पर्यटनचे प्रमुख तथा संचालक संजय नाईक आदी उपस्थित होते. यावेळी उपसंचालक हनुमंत हेडे यांनी हॉटेल रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जाची नोंदणी कार्यपद्धती आणि त्याचे फायदे तसेच इतर पर्यटन योजना याबाबत मार्गदर्शन केले. पर्यटन व्यावसायिकांनी उत्तम पर्यटन सुविधांसाठी शासन निकषाप्रमाणे हॉटेल्स व रूम यांची बांधणी करावी. पर्यटकांना जेवणाची सोय देणाऱ्या व्यावसायिकांनी अन्नभेसळ विभाग परवाना घेणे महत्वाचे आहे. निवास न्याहारी, हॉटेल व्यावसायिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने हॉटेल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत अथवा सुरक्षा रक्षक ठेवावेत. हॉटेल रिसॉर्ट ला औद्योगिक दर्जा म्हणून नोंदणीसाठी व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज भरावा. औद्योगिक दर्जा म्हणून नोंदणी झाल्यावर व्यावसायिकांना अनेक लाभ मिळवता येतील, असे हनुमंत हेडे यांनी सांगितले. तसेच साहसी पर्यटन विषयी घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मनोज हाडोळे यांनी कोकणातील कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी तसेच कृषी पर्यटन राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी पर्यटन केंद्राची देखील ऑनलाईन नोंदणी व्यावसायिक करू शकतात, कृषी पर्यटनाच्या संकल्पनेत शेतीला जोडून पर्यटन व्यवसाय असावा लागतो, तो शहरात न उभारता शहरापासून दूर ग्रामीण भागात कृषी पर्यटन केंद्र असावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्गातील ९० टक्के पर्यटन हे किनारी भागात असून याठिकाणी असलेल्या सीआरझेड मुळे व्यवसाय करण्यास अनेक अडचणी येत आहेत. औद्योगिक दर्जाच्या नोंदणीसाठी कागदपत्रे व परवानग्या मिळवताना सीआरझेडमध्ये शिथिलता मिळत नसल्याने नोंदणी करणे मुश्किल बनले आहे. शासनाकडून शॅक्स प्रकल्प राबविला जात असून यात सीआरझेडची अट शिथिल करण्यात आली असून त्याचप्रमाणे किनाऱ्यावरील निवास न्याहारी, हॉटेल्स यांनाही सीआरझेड मधून शिथिलता मिळावी. एमटीडीसीच्या वेबसाईट वर होम स्टे ची यादी अल्फाबेटिकल पद्धतीने असल्याने अनेक होम स्टे ची नावे पर्यटकांच्या नजरेस पडत नाहीत, त्यामुळे यात बदल करण्यात यावा तसेच पर्यटन संचालनालयाच्या वेबसाईटवर देखील नोंदणी असलेल्या होम स्टे, निवास न्याहारी, हॉटेल्स यांची माहिती असावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपसंचालक हेडे यांनी या सर्व समस्यांबाबत योग्य ते सहकार्य केले जाईल असे सांगितले. तर बाबा मोंडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असला तरी येथील पर्यटन व्यावसायिकांच्या अनेक समस्या असून या समस्यांच्या सोडवणुकीसाठी सर्वांची एक ताकद निर्माण व्हावी, असे सांगत व्यावसायिकांच्या समस्या व मागण्यांचे निवेदन उपसंचालकांना सादर करण्यात येईल, असे सांगितले.
