कायद्याच्या आधारेच आपण संरक्षण प्राप्त करू शकतो…

अँड शिल्पा यशवंत टिळक यांचे प्रतिपादन

मालवण दि (प्रतिनिधी) आर्थिक, शारीरिक, मानसिक, व भावनिक छळा विरुद्ध आपल्याला कायद्याच्या आधारे न्यायालयात दाद मागता येते. कायद्याच्या आधारेच आपण संरक्षण प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन ऍड. शिल्पा यशवंत टिळक यांनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलताना केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत विधी व न्याय विभागाच्या वतीने सर्वत्र कायदा साक्षरता विषयक शिबीरे घेण्यात येत असून या अंतर्गत मालवण तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आचरा, चिंदर, त्रिंबक ग्रामपंचायत येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे पार पडली. या शिबिरात ऍड. शिल्पा टिळक यांनी विधी सेवा प्राधिकरण, लोक अदालत, कौटुंबिक वाद निवारण पद्धती, महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून प्रतिबंधक कायदा, वरिष्ठ नागरिकांसाठी कायदा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. वरिष्ठ नागरिकांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांचा मुलगा, मुलगी यांची आहे. त्यांची संपत्ती वारस हक्काने ज्यांना जाते त्यांनी त्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे तसेच महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होऊ नये किंवा महिलांना न्याय मिळावा यासाठी असलेल्या महिलांच्या संरक्षणाविषयक कायद्याची माहिती महिलांनी घेतली पाहिजे, असेही ऍड टिळक यांनी सांगितले. या कायदेविषयक शिबिरांना आचरा, चिंदर, त्रिंबक गावचे सरपंच उपसरपंच ग्रा. प. सदस्य, पोलीस पाटील, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page