शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या सरस्वती म्हणजे सौ प्राजक्ता आपटे

*⚡वेंगुर्ला ता.१५-:* शिक्षक हे फक्त पाठ्यपुस्तकातील ज्ञान मुलांना देत नसतो, तर मुलांमधील असलेल्या सुप्त गुणांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, परीक्षा यातून वाव देत जणू त्यांचं जीवनकौशल्य घडविण्यात सहाय्यभूत होत असतो. अशाच शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या सरस्वती म्हणजे वेंगुर्ला येथील प्राथमिक शिक्षिका सौ. प्राजक्ता प्रशांत आपटे होय. झोळंबेसारख्या अतिदुर्गम भागात जन्म झालेल्या सौ आपटे (पूर्वाश्रमीच्या रंजिता वझे) यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झोळंबे गावातच झाले. सौ. आपटे या विविध कार्यक्रमांतून मुलांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पण त्यांची सुरुवातीची परिस्थिती अगदी बेताची होती. घर आणि शाळा हे अंतर चालत पाऊण तासाचे होते. अशा परिस्थितीचा सामना करताना दहावीमध्येही त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. १९९८ पर्यंत त्या गावातील घराघरांमध्ये वीज आली नव्हती. त्यातही हा दुर्गम भाग असल्याने तिथे भौतिक सुविधांचा अभावच होता. त्यांनी दहावीनंतर बारावीसाठी बांदा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. पण गावात येणाऱ्या ठराविकच गाड्या असल्याने कॉलेजच्या नियोजित वेळेपूर्वी बांदा गाठणे भागच होते. बारावी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी घरात विज आली. तोपर्यंत सौ. आपटे यांनी रॉकेलच्याच दिव्यावर अभ्यास केला. तरीही त्या वर्गामध्ये कायम पहिल्या तीन नंबरात असायच्याच. पानवळ कॉलजेमध्ये बीए, तर आजगाव येथे डीएड शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात त्यांची शिक्षक म्हणून पहिली नियुक्ती झाली. शिक्षकी सेवा बजावत असतानाच त्यांनी बाहेरुन परीक्षा देत बीएड, एमए यासारख्या पदव्या संपादन केल्या. तेथील ९ महिन्यांच्या कालावधीतनंतर सिधुदुर्गातील वेंगुर्ल्यात त्यांना शिक्षक म्हणून नियुक्तीपत्र आले. सध्या त्या उभादांडा-नवाबाग शाळेमध्ये कार्यरत आहेत. झोळंबे गावात सोयीसुविधा जरी नसल्या तरी आपले कुठे अडून राहू नये यासाठी त्यांनी टुव्हिलर शिकून घेतली. गावामध्ये गाडी शिकणारी ही पहिलीच मुलगी होती. त्यामुळे ग्रामस्थांना तिचे विशेष कौतुक होते. त्यावेळी टीव्हीपेक्षा रेडिओच घरोघरी असायचे. त्यामुळे रेडिओवरील गाणी ऐकण्याचा त्यांना छंद जडला. ती ऐकून त्यांनी अनेक गाणीही बसविली. तसेच त्यांना वाचनाचीहो मोठी आवड असल्याने वाचनालयाच्या होणाऱ्या वाचक स्पर्धांमधून त्यांनी अनेकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. इयत्ता नववीपासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. एनएसएस कॅम्पमधून छोट्या छोट्या स्वलिखित नाट्यछटा, वक्तृत्व, गीतगायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच असायचा. या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांनी नंबरही पटकाविले आहेत. वेंगुर्ल्यात झालेल्या साहित्य संमेलनातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. तेथील कथास्पर्धांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. साप्ताहिक किरात, साप्ताहिक व्याध यांच्या दिवाळी अंकांमधूनही त्यांच्या कथा, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. शिक्षकी पेशामध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी सहभागी व्हायला प्रवृत्त केले. केवळ सांस्कृतिक कलागुणच नाहीतर सौ. आपटे या स्कॉलरशिप, बीडीएस सारख्या शाळाबाह्य स्पर्धा-परीक्षांना शालेय विद्यार्थ्यांना बसवून त्यांचा अभ्यास घेण्यासाठी शाळेच्या नियोजित वेळेनंतरही जादा वेळ थांबत मुलांना मार्गदर्शन करतात. सौ. आपटे यांचे वडील श्री गणेश वझे हे उत्कृष्ट तबला वादक व गायक असल्याने त्यांनी एक दशावतार नाट्यमंडळही सुरु केले होते. त्यातील सर्व कलाकार हे नविन असल्याने नाटकाच्या तालमी घरीच होत असत. लहानपणी नकळत घडलेले हे संस्कार आता प्राथमिक शाळेत मुलांना दशावतार शिकविताना उपयोगी पडत असल्याचे सौ.आपटे या आवर्जून सांगतात. कोरोनाकाळातही घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत कोविड योद्धा म्हणून कार्यरत असताना सुद्धा शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन तास घेण्यासोबत वेंगुर्ल्यातील काही भागात नेट कनेक्टीवीटी नसल्याने अशा मुलांकरीता त्यांच्या घरी जात त्यांनी मार्गदर्शन केले. शिवाय त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे विद्यार्थीही विविध स्पर्धांमध्ये, क्षेत्रांमध्ये चमकत आहेत. शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी धडपडणाऱ्या सौ. प्राजक्ता आपटे या सरस्वतीच्या उपासिकेला ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलकचा कोटी कोटी प्रणाम व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा…..

You cannot copy content of this page