मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
*⚡कणकवली ता.१३-:* मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे सिंधुदुर्गात मनसेची संघटना वाढविण्यात मोठे योगदान होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्ष संघटना वाढवून अनेकांना त्यांनी मनसेशी कनेक्ट केले. सर्वसमान्यांच्या न्याय व हक्कांसाठी प्रशासना विरोधात लढा दिला. दाभोलकर यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून या संकटप्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून आपल्या परीने मदतीचा हातभार लावला पाहिजे. तसेच मनसैनिक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनसे प्रयत्न करेल असे मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे शोकसभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुका संपर्कप्रमुख हेमंत जाधव, समीर चिले, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, चंद्रशेकर उपरकर, अनिल हळदिवे यांच्यासह पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब म्हणाले, राजन दाभोलकर हे लढवय्या मनसैनिक होते. त्यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यातील मनसेचे मोठे नुकसान झाले असून हे नुकसान कद्यापही भरून न येणार आहे. दाभोलकर यांच्या लढवय्या बाण्याचा मनसैनिकांनी आदर्श घेऊन पक्ष संघटना वाढवूया आणि त्यांच्या कुटुंबीयांंना दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आधार व पाठबळ देऊया. उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री म्हणाले, राजन दाभोलकर यांच्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याच्या निधनामुळे जिल्ह्यातील मनसेची मोठी हानी झाली असून त्यांच्या आत्मास शांती लाभो, अशी प्रार्थना करून त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रशेखर उपरकर म्हणाले, राजन दाभोलकर हे सामाजिक कार्यकर्ते होते. मनसेची जिल्ह्यात संघटना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या जाण्यामुळे मनसेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनिल हळदिवे म्हणाले, राजन दाभोलकर यांना सामाजिक प्रश्न व समस्यांची जाण होती. हे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या परिने काम केले. त्यांच्या कोणतीही जबाबदारी दिल्यानंतर ते निष्ठने व प्रामाणिकपणे पार पडत असत. त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला पाहिजे, असे सांगून त्यांच्या आठवणींनी ताज्या केल्या. यावेळी उपस्थित मनसैनिकांनी राजन दाभोळकर यांना श्रद्धाजंली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
