प्रबळ इच्छाशक्ती ठरली डॉक्टर होण्यासाठी मार्ग

खडतर प्रवास करीत दाणोलीच्या डॉ निर्मला सावंत यांनी केले स्वतःला सिद्ध;वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटविला आहे या स्त्री शक्तीने

*⚡सावंतवाडी ता.१३-:* मनात प्रबळ इच्छाशक्ती असलीं की, कोणत्याही मोठ्या संकटांवर, हालाखीच्या परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते. हे दाखवून दिले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अतिशय दुर्गम भागातील दाणोली येथील ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव उमटवले अशा स्त्री शक्ती डॉ. निर्मला सावंत… मनात प्रबळ इच्छा असली की समोर कितीही संकटे आली त्यावर आपण मात करू शकतो. हे दाखवून दिलं आहे. डॉ. निर्मला सावंत यांनी. घरीच गरीब परिस्थितीत, आई वडील शेतकरी परंतु, अशा परिस्थितीत शिक्षण घेण्याची त्यांची जिद्दच त्यांना आज या यशाच्या शिखरावर घेऊन गेली आहे. घरात चार बहिणी, एक भाऊ. घरची अत्यंत गरीब परिस्थिती वडील केवळ सातवी तर आई चौथी शिकलेली, घराला हातभार लावावा म्हणून भाऊ १० वी नंतर गवंडी काम करू लागला. परंतु, अशा परस्थिती वाढत असताना देखील निर्मला ह्या अंत्यंत हुशार होत्या. घरातील आर्थिक तिचे शिक्षण मुननकर गुरुजी माहिती असल्याने त्यांनी तिचा नवोदय विद्यालयाचा परीक्षेचा फॉर्म भरत परीक्षेचा अभ्यास करवून घेतला. त्यामुळेच निर्मला ह्या नवोदय विद्यालयाची परीक्षा पास झाल्या त्यांना सहावीत असताना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. तिच्या आई वडिलांनी देखील कोणत्याही प्रकारचे आडे वेडे न घेता तिला नवोदय विद्यालयात जाऊन शिक्षण घेण्याची परवानगी दिली. केंद्रीय बोर्डाचा अभ्यास असल्याने नवोदय विद्यालयाने त्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी दिली. इथे शिक्षण घेताना त्यानी घेतलेली मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर त्या पहिल्यापासूनच टॉपर राहिल्या. दहावीत त्यानी ८८ तर बारावीत ८४ टक्के गुण मिळवत यश प्राप्त केले. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे शिक्षण थांबवायचे की नर्सिंग किंवा डी. एड करायला द्यायचे हा प्रश्न त्यांच्या वडिलांच्या समोर होता. अशावेळी त्यांची अनावधानाने भेट झाली ते डॉ. परुळेकर यांच्याशी त्यानी निर्मला यांचा कल ओळखला आणि तिला समजावले. एक रुपयाही डोनेशन न देता जर डॉक्टर व्हायचे असेल तर प्रचंड मेहनत घेत अभ्यास करावा लागेल. मुंबईला राहून शिक्षण घ्यावे लागेल. अनेक संकटाना तोंड द्यावे लागेल. असे संगित्यावरही डॉक्टर होण्याची तिची जिद्द काही गेली नाही. यावेळी डॉ. परुळेकर यांनी ठरवले तिला डॉक्टर करायचेच. त्यानी मुंबई स्थित आपल्या डॉक्टर मित्रांच्या कानावर घातले. या काळात निर्मला यांनी मेडिकल साठीची पहिली परीक्षा दिली होती. परंतु, योग्य मार्गदर्शना अभावी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. परंतु, त्यानंतर डॉ. परुळेकर यांच्या प्रयत्नांनी डॉ. अभंग प्रभू यांनी आपल्या कोचिंग क्लासेस मध्ये एक रुपयाही न घेता त्यांना प्रवेश दिला. या काळात त्यांना अनेक वाईट प्रसंगाना तोंड द्यावे लागले. परंतु, याही काळात न डगमगता त्यांनी दिवसातील १५ – १५ तास अभ्यास करत वैद्यकीय प्रवेशासाठी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि दुसऱ्याच प्रयत्नांत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात २९६ वा क्रमांक प्राप्त केला. तिच्या या रॅकमुळे त्यांना डोनेशन शिवाय एम. बी. बी. एस साठी जे.जे. ला प्रवेश मिळाला. या काळात तिने अथक प्रयत्न करून त्यांनी विविध स्कॉलरशिप मिळवल्या. त्यामुळे त्याचा कॉलेज फीचा मार्ग मोकळा झाला. विशेष गुणवत्तेसह त्यानी एम बी बी एस होऊन आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एक वर्ष जे जे मध्येच इन्टर्नशिप पूर्ण केली. त्या यावरच थांबल्या नाहीत. लग्नानंतर त्यानी आपले पती डॉ. उमेश सावंत यांच्या बरोबर वैद्यकीय क्षेत्रातील आपले उच्चशिक्षण पूर्ण केले. त्यानी डी.एन.बी. मेडीसिन ही उच्च पदवी प्राप्त केली आहे. हे संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाचे मोलाचे असे सहकार्य आणि पाठिंबा मिळाला. आपल्या अथक प्रयत्नांनी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एक गरीब घरातील मुलगी आज डॉक्टर म्हणून काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन पुन्हा मागे सिंधुदुर्गात परतल्यावर त्यानी सुरुवातील जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मिलिटरी हॉस्पिटल आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे देखील सेवा दिली. त्यानंतर २०१५ पासून त्या शहरात प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहेत. जिद्द असली की कोणतीच परिस्थितीत तुमचं यश तुमच्या पासून हिरावू शकत नाही. हेच डॉ. निर्मला सावंत यांनी आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले आहे. हीच जिद्द समाजातील इतरही मुलांनी बाळगून यश संपादन करावं अस त्या आवर्जून सांगतात. आपल्या गरीबीवर मात करत डॉक्टर होऊन यशाचे शिखर गाठलेल्या या स्त्री शक्तीला ग्लोबल महाराष्ट्र कडून प्रणाम…

You cannot copy content of this page