जाणून घेतली माहिती:राज्याचे अधिकारी सुद्धा सहभागी
वेंगुर्ला प्रतिनिधी-ग्रामीण भागातील गरजू लोकांना रोजगार मिळावा, खेड्यापाड्यातील कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगांना स्थैर्य प्राप्त व्हावे, तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणावर वृद्धी व्हावी, त्याचप्रमाणे कारागीरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास उत्तेजन देण्यासाठी व तयार मालाच्या विक्रीस मदत करण्याच्या हेतूने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून स्थानिक साधन सामग्रीचा वापर करुन ग्रामीण भागातील कारागीरांना रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार तर्फे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार खादी ग्रामोद्योग आयोग-भारत सरकारचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योगाचे संचालक मनीष कांबळी यांनी वजराठ येथील सावंत-भोसले यांच्या हातमाग व्यवसायाची पहाणी केली. येत्या महिन्याभरात खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून वजराठ गावातील महीलांसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी २५ चरखे व ५ हातमाग देण्यात येणार असून त्यांना व्यवसायासाठी कच्चा माल पुरविला जाणार आहे. तसेच तयार झालेला पक्का माल खादी ग्रामोद्योग विभाग घेऊन त्याबदल्यात महिलांना कामाचा मोबदला देण्यात येणार आहे . यावेळी कॉनबॅकचे मोहन होडावडेकर, वजराठ सरपंच महेश राणे, उद्योजक सुधाकर भोसले, भाजपा तालुका चिटणीस नितिन चव्हाण, वामन भोसले, मंगेश परब, राजन परब, विजय पेडणेकर, संतोष भोसले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
