स्त्रीला सक्षम करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ. मुग्धा प्रविणकुमार ठाकरे…
*⚡सावंतवाडी ता.१२-:* आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो. याच भावनेने समाजसेवेत झोकून देऊन अनेक संस्थांमध्ये प्रामुख्याने सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या स्त्री शक्ती डॉ. मुग्धा प्रवीणकुमार ठाकरे… डॉ. मुग्धा ठाकरे – पांपट्टीवार यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तळागाळातील – ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. आणि नागपूर येथेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. एम. डी चे शिक्षण घेत असताना त्यांना “अध्यापक” या क्षेत्राची आवड निर्माण झाल्याने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात शिक्षक होण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २००१ ते २००२ हे एक वर्ष गडहिंग्लज येथील कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय मध्ये विद्यादानाचे कार्य केले. त्यानंतर २००२ पासून आजतागायत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय येथे विद्यादानाचे कार्य करत आहेत. त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली. पती डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी देखील समाजसेवेचे व्रत अंगिकारल्याने त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावत समाजकार्य सुरू ठेवले. शैक्षणिक कालावधी पासूनच त्यांनी मानव उथान सेवा समितीच्या माध्यमातून सेवा व अध्यात्मामध्ये पूर्वी नागपूर तर सद्य स्थितीत वास्को – गोवा येथे त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. मेडिकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीर मध्ये सक्रिय सहभाग घेत त्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करत जनजागृती करतात. त्याच सोबत त्या महिला दिनांचे औचित्य साधत महिलांना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करतात. रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या किशोरी विकास प्रकल्पांतर्गत त्या किशोरी वयातील मुलींना उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक विविध समस्यांवर मार्गदर्शन करत त्यांचा मनात आरोग्य विषयक जनजागृती करतात. सामाजिक जाणिवेतून डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी स्थापन केलेल्या सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान च्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक सेवा कार्यात त्या सक्रिय सहभाग घेत असतात. या प्रतिष्ठानच्या त्या कार्यकारी सदस्य म्हणून कार्य करत आहेत. समाजात जनजागृती व्हावी, समाजाची सेवा करता यावी यासाठी त्या नेहमी नव नवीन उपक्रम प्रतिष्ठानला सुचवत असतात आणि ते उपक्रम सत्यात उतरवण्यासाठी त्या स्वतः झडत असतात. महिलांनी देखील आपल्या परीने समाजसेवा करावी, त्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी त्या नेहमी महिलांना प्रोत्साहित करत असतात. गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना पैशांअभावी शिक्षण सोडावे लागू नये, त्यांना त्यांच्या स्वतःचा पायावर उभे राहून, आपल्या कुटुंबाला मदत करता यावी. यासाठी दरवर्षी त्या काही मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात. त्या मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःचा पायावर उभे राहिल्यावर आपणाला खूप आनंद होतो. असे त्या सांगतात. समाज कार्य करताना ह्या हाताने केलेले कार्य त्या हाताला समजू नये, असे म्हणतात. या उक्तीला त्या सत्यात उतरवून आपले कार्य अविरत पणे करत असतात. ना कोणत्या प्रसिद्धीची आवड ना कोणाच्या शाब्बासकीची, आपले कार्य आणि आपण यातच त्या धन्यता मानतात. आपल्या प्रामाणिक कार्यातून समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या या स्त्री शक्तीला ग्लोबल महाराष्ट्र कडून प्रणाम…
