मालवण दि प्रतिनिधी लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यात महाविकास आघाडीने आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला मालवणात थंड प्रतिसाद मिळाल्याने बंदचा फज्जा उडाला. मालवणातील सर्व दुकाने, बाजार व आस्थापने सुरू होती तसेच आठवडा बाजार असल्याने परगावातील व्यापारीही दाखल झाले होते. सर्व काही सुरू असल्याने सकाळी साडे अकरा वाजता महाविकास आघाडी मधील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शहरातून फेरी काढत व्यापारी, विक्रेते यांना दुकाने एक तासासाठी बंद करण्याचे आवाहन केले हे करीत असतानाच महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी परगावातून आलेल्या काही भाजी विक्रेत्यांना दमदाटी करत त्यांच्या भाजीची बास्केट उलथवून टाकत भाजी फेकून देण्याचा प्रकार केल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे एकूणच या प्रकारामुळे नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीतर्फे ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदला मालवणात थंड प्रतिसाद मिळाला. आज मालवणचा आठवडा बाजार असल्याने परगावातील व्यापारी सकाळपासूनच शहरात दाखल होत मुख्य बाजारपेठ व देऊळवाडा नाका येथे आपली दुकाने थाटली होती. तर शहरातील बाजारपेठेसह सर्व दुकाने, छोट्या विक्रेत्यांच्या गाड्या, स्टॉल आदी सर्व सुरू होते. तसेच इतर खासगी आस्थापना देखील सुरू होत्या. हा बंद दुपारपर्यंत असल्याने व्यापाऱ्यांनी एक तास दुकान बंद ठेवावे असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले होते. मात्र मालवणातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली होती. बंद च्या पार्श्वभूमीवर मालवणात सर्व काही सुरू असताना साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शहरातून फेरी काढत व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांना आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तर निषेध असो निषेध असो केंद्र सरकारचा निषेध असो अशा निषेधाच्या घोषणाही दिल्या. यावेळी देऊळवाडा येथे भरलेल्या आठवडा बाजारात परगावातील काही भाजी विक्रेत्यांना दुकान बंद करण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यानी करत विक्रेत्यांचे भाज्यानी भरलेली बास्केट उलथवून टाकली. या प्रकारामुळे भाजी विक्रेत्यांबरोबर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शहरात फेरी काढल्यानंतर मालवण पोलीस ठाण्यात लखीमपूर येथील हत्याकांडाच्या निषेधाचे निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी लखीमपूर येथे घडलेली घटना म्हणजे शेतकऱ्यांवर झालेला हिंसाचार असून त्याचा निषेध म्हणून आजचा बंद पाळला आहे, हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे सांगतांनाच व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे होते, बंद साठी आम्ही लोकांना विनंती केली, जबरदस्ती केली नाही असा दावा त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, पल्लवी तारी, गणेश पाडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, पं. स. सदस्य विनोद आळवे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बबन शिंदे, बाळू नाटेकर, दीपा शिंदे, अंजना सामंत, नंदा सारंग आदी व इतर उपस्थित होते.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा मालवणमध्ये फज्जा
