जिल्ह्याच्या पहिल्या पोस्ट वुमन सरोजताई तेली यांचा थक्क करणारा प्रवास;तारुण्यात वैधतव्य:दोन लहान मुले:आभाळभर संकटे झेलत उभी राहिलेली स्त्री शक्ती
*⚡सावंतवाडी ता.०९ प्रसन्न गोंदावळे-:* ऐन तारुण्यात पदरी वैधव्य आलं. कमी वयात संसाराची जबाबदारी, पदरात तीन कोवळी मुलं, पतीच्या आकस्मित निधनानंतर लहान मुलाचं निधन… अशी एक न एक आभाळा एवढी दुःख कोसळत असताना देखील आपल्या लहान दोन मुलींसाठी कंबर कसून, सासरच्या लोकांचा बाहेर काम करण्यासाठी असलेला विरोध न जुमानता उभा राहिल्यात त्या स्त्री शक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात पहिल्या पोस्टवुमेन श्रीमंती सरोजताई तेली.लहान वयातच संसाराची जबाबदारी अंगावर पडली. या संसाराची स्वप्न रंगवत असतानाच पतीचे कावीळ सारख्या आजाराने आकस्मित निधन झाले. अवघा पाच वर्षांचा संसार पदरात तीन कोवळी मुल. पतीच्या अकाली निधनाने समोर दिसत होता तो दुःखाचा डोंगर. संसाराला हातभार लावायला कोणाचीच मदत नाही. माहेरची परिस्थिती देखील बेताचीच. अशातच कोवळ्या वयात लहान मुलाचे देखील निधन. नियती जशी काय परीक्षाच बघत होती या माऊलीची. परंतु, तरी देखील ही माऊली आपल्या दोन मुलींसाठी उभी राहिली. समोर दिसत होत ते काळाकुट्ट, अंधारमय भविष्य. पण या अशा कठीण काळात त्यांना एक आशेचा किरण दिसला. पती मुंबई येथे पोस्ट खात्यात नोकरीला होती. त्या जागेवर त्यांना अनुकंपा खाली नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्यांना तिथे नोकरी मिळाली. परंतु, यावेळी देखील त्यांच्या सासरच्या लोकांनी नोकरी करण्यासाठी विरोध केला. परंतु, या विरोधाला न जुमानता आपल्या लहान मुलांसाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण, मुंबईसारख्या नवख्या शहरात आपल्या मुलांसह राहून नोकरी करणे त्यांना कठीण जात होते. यातच सावंतवाडी पोस्ट ऑफिस मध्ये जागा रिक्त झाल्याने त्यांना सावंतवाडीत पोस्टिंग मिळाली.
