नवरात्रोत्सवाला प्रारंभ
*⚡ओरोस ता.०७-:* पितृ पंधरावडा संपल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा दसरोत्सव गुरुवारी सुरू झाली. जिल्ह्यात एकूण १५१ ठिकाणी दुर्गा देवीची घटस्थापना करण्यात आली. विधिवत पूजन करून स्थापन करण्यात आलेल्या दुर्गेचा रातजागर आता ९ दिवस सुरू झाला आहे. वाजत गाजत देवीचे आगमन झाल्यानंतर तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवानंतर जिल्हावासियांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले होते. त्यासाठी गरबा, दांडियाची पूर्व तयारी सार्वजनिक मंडळांनी तयारी केली होती. कोरोनामुळे प्रशासनाने गर्भा-दांडियावर निर्बंध घातले असले तरी मंडळे यासाठी तयारीत आहेत. आज घटस्थापने दिवशी जिल्ह्यात ११७ सार्वजनिक तर ३४ खासगी अशा मिळून १५१ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याशिवाय अनेक देवींच्या मंदिरातही या उत्सवाचे थाटात पूजन करण्यात आले. आकारभवाणी, ग्रामदेवता याठिकाणी घटस्थापना करण्यात आली. सिंधुदुर्गात देवींच्या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्याची गावागावांत परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांत सार्वजनिक दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. दुर्गामातेचा नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा सुरू झाल्यापासून गुजरातचा गरबा नृत्यालाही या भागात पसंती मिळाली. दुर्गामातेसमोर गरबा नृत्य करणाऱ्या मंडळाच्या टीमची स्पर्धाही घेतली जाते. जिल्हाभरात गरबा नृत्याच्या विविध टीम ठिकठिकाणी पोहोचतात. गौरी-गणपती सणानंतर नवरात्रोत्सव सुरू होतो, पण या सणापूर्वीच मंडळाचे कार्यकर्ते व गरबा नृत्य करणाऱ्या टीमचा सराव सुरू होतो. नवरात्रोत्सव जिल्ह्य़ातील गावागावांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
