स्मिता नाईक यांनी संकटे व आर्थिक स्थितीवर मात करीत केली यशस्वी वाटचाल
*⚡सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यातील आजगाव या गावात जन्माला आलेल्या आणि अथक प्रयत्न, संकटावर, घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत शिक्षकी पेशात आपल नाव उमटवलेल्या स्त्री शक्ती सौ. स्मिता रवींद्र नाईक म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नंदा आजगावकर. लहानपणीच एका अपघातात आई वडिलांचे निधन झाल्याने सौ. स्मिता उर्फ नंदा यांच्यासह त्यांच्या इतर तिन्ही भावडाचा सांभाळ त्यांचे मामा आणि मामी श्री. व सौ. गजानन आजगावकर आणि श्री. व सौ. बाळकृष्ण आजगावकर यांनी केला. सौ. स्मिता नाईक यांचे बालपण आजगाव येथे गेले. त्यांचे संपूर्ण शिक्षण आजगाव येथेच झाले असून, पूर्ण प्राथमिक शाळा आजगाव नंबर १ येथे प्राथमिक शिक्षण तर विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तर विद्या विकास ट्रेनिंग कॉलेज आजगाव येथे त्यांनी आपले डीएडचे शिक्षण पूर्ण केले. बालपणी आपल्या आजू बाजूला वावरणाऱ्या व्यक्ती, परिसर यांची छाप काही प्रमाणात मुलांवर पडते. तीच छाप आपल्यावर देखील पडली आणि आपण डी. एड. केले असे ते आवर्जून सांगतात. गावातच डी एड कॉलेज असल्याने अनेक विद्यार्थी दरवर्षी येथे यायचे आणि शिक्षक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करायचे. तेच स्वप्न लहानपणी आपणाला पडू लागले. आणि मामा मामींच्या आशीर्वादाने, पाठिंब्यामुळे मी आज एक शिक्षक म्हणून उभी राहू शकले. असे त्या सांगतात. या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना अनेक शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभले. त्यामुळे एक उत्तम शिक्षक त्या होऊ शकल्या. शिक्षकी पेशा हे एक व्रत असून, ती उपासना आहे. विद्यार्थी हे आपले दैवत आहे. या अशा भावनेने ते आजही विद्या दानाचे काम अखंड करत आहेत. आणि त्यामुळेच त्यांनी विद्यार्थी, पालक आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या मनात, ह्रुदयात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना त्रासदायक ठरू नयेत यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. कुडाळ तालुक्यातील कुसगाव सारख्या अती दुर्गम भागातून त्यानी आपला शिक्षकी पेशा सुरू केला. परंतु, या भागात देखील आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यानी सर्वांच्या मनावर एक वेगळी छाप टाकली. गेली ३० ते ३५ वर्ष त्या शिक्षकी क्षेत्रात कार्यरत असून, सद्य स्थितीत न्हावेली शाळा येथे मुख्याध्यापिका म्हणून प्रामाणिक पणे काम करत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्या सहकारी शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम मुलांसाठी, गावातील स्त्रियांसाठी राबवत असतात. या उपक्रमातून त्या गाव आणि शाळा यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा एक विश्वासाचं नात निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अध्ययन आणि अध्य्यापन यातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडवणे यातच त्यांना आनंद प्राप्त होतो. त्यांनी आतापर्यंत शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे. त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजेच जनसेवा निधी बांदा यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार (२०१०-११), नेमळे पंचक्रोशी हायस्कूल तर्फे प्रमिलाताई जाधव आदर्श शिक्षिका पुरस्कार (२०१०-११), लोकमान्य मल्टिपर्पज तरुण भारत तर्फे शैक्षणिक कार्यातील योगदान पुरस्कार (२०१०-११), शिक्षक दिनानिमित्त सिंधुदुर्ग शिक्षकसेवा सन्मान पुरस्कार (२०१५), मळगाव येथील ग्रामस्थांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे. तसेच त्यांनी लिहिलेल्या विविध कथांना अनेक स्पर्धांमध्ये यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या या सगळ्या यशात त्यांचे मामा मामी यांच्यासह त्यांचे पती श्री. रवींद्र नाईक यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. शिक्षकी पेशा आणि शाळा आणि तेथे शिकणाऱ्या मुलांविषयी असणारी आत्मीयता यामुळे त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींकडे हवा तसा लक्ष देता आला नाही. परंतु, त्यांचे पती, बहीण आणि नणंद यांच्यामुळे ते आपल्या पेशाला न्याय देऊ शकल्या. समाजातील मुलांसाठी, स्त्रियांसाठी त्यानी जे काही कार्य केले. त्यांचेच आशीर्वाद म्हणून आज त्यांच्या दोन्ही मुली व जावई उच्च शिक्षित असून, आपल्या क्षेत्रात ते नाव कमवत आहेत. आज त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, चार्टर अकाउंटंट, इंजिनीयर, शिक्षक, व्यवसायिक, प्रगतशील शेतकरी असून, आपला वेगळा ठसा निर्माण करत आहेत. एक शिक्षक म्हणून हीच त्यांच्या निस्वार्थी विद्या दानांची पोचपावती आहे. आजही गावातील मुलांसाठी त्यांच्या घरी त्यांनी वाचनालय सुरू केले आहे. आपल्या जन्मदिनी त्या विद्यार्थ्याना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करतात. गावातील आजारी व्यक्तीना आपल्या परीने शक्य तेवढी मदत ते करतात. कोरोना सारख्या कठीण काळात देखील त्यानी अनेकांना सहकार्य केले. शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आणि आपल्या कार्य कौशल्याने विद्यार्थ्यां त्यांच्या पालकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेल्या या स्त्री शक्तीला ग्लोबल महाराष्ट्र कडून प्रणाम…
