गटविकास अधिकारी उमा घारगे – पाटील यांना दिले निवेदन
वेंगुर्ला: मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले शहरातील शाळा नं. २ वर वडाचे झाड पडून नुकसान झाले होते. हे झाड काढण्याबाबत वारंवार लेखी पत्राद्वारे कळवून सुद्धा अद्यापपर्यंत दखल न घेतल्याने अशा धोकादायक इमारतीमध्ये ४ ऑक्टोबर पासून सुरू होत असलेल्या शाळेत मुलांना अनिश्चित काळासाठी न पाठवण्याचा निर्णय शाळेतील पालकांनी घेतला आहे. याबाबत आज (४ ऑक्टो.) पालकांनी गटविकास अधिकारी उमा घारगे- पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शालेय परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे हित पाहून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा वेंगुर्ले शाळा क्र. २ च्या धोकादायक इमारतीमध्ये मुलांना न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. दरम्यान या बाबत येत्या ८ दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास पालकांनी उपोषणाचाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन पालक संजय पिळणकर, अश्वेता माडकर, साक्षी प्रभू खानोलकर, आरती आरोलकर, वर्षा आरोलकर, प्रशांत निकम, सुदेश वेंगुर्लेकर, सुधीर कामत, सदानंद गिरप, कैवल्य पवार, अभिजित माडकर, गार्गी पेठे, सलोनी गिरप यांच्यासाहित अन्य पालकांनी आपल्या स्वाक्षरी सहित सादर केले आहे. फोटो: गटविकास अधिकारी उमा घारगे- पाटील यांना निवेदन देताना वेंगुर्ले शाळा नं २ मधील विद्यार्थ्यांचे पालक
