पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू
मालवण दि प्रतिनिधी देवबाग येथिल कर्ली खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या चार होड्या ग्रामस्थांनी पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिल्यानंतर मालवण पोलिसात बोट मालक सागर परब (कुडाळ), मुकेश नामदेव सारंग (कोरजाई), लीलाधर जगदीश खोत (कोरजाई) या तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान प्रशासनाने या कारवाईत चार होंड्यासह २३ ब्रास वाळू तसेच वाळू काढण्याचे साहित्य जप्त केले आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेले काही महिने देवबाग येथील कर्ली खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असून याबाबत देवबाग ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी मालवणच्या महसूल प्रशासनाकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली होती मात्र निवेदन देऊनही कर्ली खाडीत होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात कारवाई केली गेली नाही त्यामुळे संतप्त बनलेल्या देवबाग वासीयांनी आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कर्ली खाडीत वाळू उत्खनन करणाऱ्या चार होड्या पकडल्या व त्या प्रशासनाच्या ताब्यात दिल्या दरम्यान, याबाबत मालवण मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी अनधिकृत वाळू उपसा व शासकीय मालमत्तेची चोरी प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मालवण पोलीस स्थानकात बोट मालक सागर परब (कुडाळ), मुकेश नामदेव सारंग (कोरजाई), लीलाधर जगदीश खोत (कोरजाई) या तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ग्रामस्थानी पकडलेल्या तिन्ही बोटी, साहित्य व कामगार हे नायब तहसीलदार श्री. कोकरे यांच्या ताब्यात दिल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, जप्त केलेल्या बोटी व त्यावरील साहित्य देवबाग खाडी किनारी ठेवण्यात आले आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती यावेळी मालवण पोलिसांनी दिली.
