खा विनायक राऊत यांचा आरोप;यावर्षी पहिली बॅच सुरू होणार असल्याचा केला दावा
ओरोस-:सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल महाविद्यालया पेक्षा सातारा, अलिबाग शासकीय महाविद्यालयात त्रुटी होत्या. तरीही त्यांना मान्यता मिळाली. केवळ सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये त्रुटी काढत मंजुरी दिलेली असताना त्रुटी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. हे केंद्रीय समितीला उशिरा का सुचले शहाणपण. यामागे कोणाचा स्वार्थ आडवा येत आहे. कोणाच्या उपक्रमावर बंधने येणार आहेत. त्यामुळे हा जावई शोध लावला गेला, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता टोमणा मारीत खा विनायक राऊत यांनी केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पूर्ण करीत पुन्हा प्रस्ताव ३० रोजी सादर करण्यात आला आहे. कितीही काळी मांजरं आडवी आलेतरी १०० टक्के मिरीटने मान्यता मिळवत यावर्षी पहिली १०० मुलांची बॅच प्रवेश घेणारच, असे सांगितले. ओरोस फाटा येथील आपल्या संपर्क कार्यालयात खा राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आ वैभव नाईक, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते. यावेळी बोलताना खा राऊत यांनी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय मेडिकल कमिशनने १७ सप्टेंबर रोजी मान्यता दिली. त्यांनीच २१ सप्टेंबर रोजी त्रुटी सांगत ती पूर्ण करण्याची मुदत दिली. त्रुटी पूर्ण करण्यास सांगितले आहे. परंतु मान्यता रद्द केलेली नाही. ही कमिटी जिल्ह्यातून परत जावी यासाठी काहींनी प्रयत्न केले होते. त्यांना येथे शासकीय महाविद्यालय होऊच नये, असे वाटत आहे. मात्र, आम्ही शांत बसलेलो नाही. कारण यात आमचा किंवा पक्षाचा स्वार्थ नाही. स्वार्थ आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, असे ते म्हणाले. परीक्षा हॉल नाही. स्टाफ क्वाटर्स सुविधा नाहीत. फर्निचर नाही,अशा त्रुटी काढण्यात आल्या होत्या. त्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र, आम्ही त्या आधीच पूर्ण केल्या आहेत. तसा प्रस्ताव पुन्हा पाठविला आहे. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा समिती कधी येते ? याबाबत उत्सुकता आहे. पावणे दोन कोटींचे फर्निचर उभारले आहे. एमबीबीएससाठी पुस्तके उपलब्ध केली आहेत. परीक्षा हॉल स्वतंत्र आहे. आता मेडिकल कॉलेजला पूर्णवेळ डीन मिळाले आहेत, असेही खा राऊत यांनी सांगितले.
