*⚡कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नव्याने लाभलेले शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांचे कणकवली येथे आगमन होताच ‘बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाचे’ जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिक्षक असताना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांना मेरीट मिळवून देण्याबाबत आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक असणारे मुस्ताक शेख हे पहिल्या प्रयत्नातच एमपीएससी यशस्वी होऊन सेट क्लिअर बरोबर पीएचडी झाल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत झालेल्या शैक्षणिक चर्चेमध्ये विनायक हरकुळकर यांनी जागतिक कोरोना महामारीनंतर कोरोना लाट ओसरत असताना दोन वर्षे एवढ्या दीर्घ कालावधीनंतर शाळा सोमवार पासून सुरू होत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढायचे असेल तर पर्यवेक्षण यंत्रणेतील रिक्त पदे पूर्णतः भरणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यामध्ये आठही तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी पदांवर प्रभारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी काम पाहत असून आठही तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर रिक्त असलेली विस्ताराधिकारी पदे, रिक्त असलेली केंद्रप्रमुख पदे लवकर भरण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करावेत अशी मागणी मुस्ताक शेख यांच्याकडे विनायक हरकुळकर यांनी केली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण जे जे नव नवीन शैक्षणिक उपक्रम राबवाल या उपक्रमांच्या सोबत ‘बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ’ कायम असेल आणि सहकार्य करेल अशी ग्वाही विनायक हरकुळकर यांनी मुस्ताक शेख यांना दिली आहे. यावेळी मुस्ताक शेख यांनी आपण शैक्षणिक प्रगतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल होण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी जयप्रकाश दहिफळे आणि विपुल भोसेकर उपस्थित होते.
नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांचे बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाने स्वागत
