*⚡बांदा :ता.०२-:* सिंधुदुर्गात प्रचंड जैवविविधता आहे. वन्यजीवांच्या परस्पर संबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती व त्यादृष्टीने जनजागृती होणे आवश्यक आहे. वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवून वन्य प्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी ग्रामस्थांना केले. सावंतवाडी वनविभागच्यावतीने बांदा वन परिमंडळाअंतर्गत तांबुळी ग्रामपंचायत येथे वन्यजीव सप्ताहवेळी ग्रामस्थांना वन्यजीवांबद्दल माहिती देताना श्री.मेस्त्री बोलत होते. तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, वनरक्षक श्री. शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते. वनपाल मेस्त्री पुढे म्हणाले की, दगदगीच्या जीवनात वन्यजीवांच्या माहितीपासून मनुष्य दुरावत चालला आहे. ही परिस्थिती बदलून वन्यजीवांचे रक्षण होण्यासाठी आणि नवीन युवा पिढीला आनंद घेण्यासाठी वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा. ज्यामुळे त्यांच्या बद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात, असे श्री. मेस्त्री म्हणाले. तर वनविभागाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करण्यात येईल असे सांगत सरपंच अभिलाष देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.
तांबुळीत ‘वन्य जीव सप्ताह’ साजरा
