सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमात आनंद प्रभूवालावलकर यांचे प्रतिपादन
मालवण दि प्रतिनिधी बँकेची नोकरी करताना अनेक माणसे भेटली खूप काही शिकता आले, अनेक चढउतार पाहिले बँकेत आलेला ग्राहक हा नाखूष होऊन जाता कामा नये तर त्या ग्राहकाला बँक ही आपली बँक आहे असे वाटले पाहिजे या दृष्टीने आपण बँकेला कुटुंब माणून जाणीवपूर्वक काम केले. बँकेच्या सेवा काळात आपण सर्वांनी दिलेले प्रेम हे माझ्यासाठी पूढील आयुष्यात जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देईल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मालवण शाखेचे शाखाधिकारी श्री. आनंद प्रभूवालावलकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच शाखाधिकारी श्री. आनंद प्रभूवालावलकर नियत वयोमानानुसार बँकेत ३८ वर्षाची सेवा बजावत सेवानिवृत्त झाले. त्यावेळी आयोजित सेवा निवृत्तीपर कार्यक्रमात श्री. आनंद प्रभूवालावलकर हे बोलत होते. यावेळी मालवण तालुका विकास अधिकारी विश्वनाथ डोर्लेकर, नूतन शाखाधिकारी सोमा सकपाळ, दाजी हडकर, माजी शाखाधिकारी रमेश कुबल, कर्मचारी संघटनेचे सुरज गवंडी आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी नूतन शाखाधिकारी सोमा सकपाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर विश्वनाथ डोर्लेकर यांनी आनंद प्रभूवालावलकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलताना श्री. आनंद प्रभूवालावलकर म्हणाले, पदवीधर झाल्यानंतर विक्री कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या सारख्या पदांच्या अनेक परीक्षा दिल्या होत्या व पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्णही झालो मात्र आर्थिक परिस्थितीमुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकलो नाही साहजिकच बँकेची नोकरी मिळाली. जिल्हा बँकेत मी अपघाताने नोकरीस लागलो. काही काही वेळा वाटायचे बँकेची ही रुक्ष, कंटाळवाणी नोकरी सोडायची. आज सोडूया उद्या सोडेन असे म्हणत म्हणत आजपर्यंत मी काही नोकरी सोडली नाही. बँकेच्या नोकरीच्या प्रवासात माझ्या हाताखाली काम करणारी काही मंडळी अधिकारी पदापर्यंत पोहोचली मी त्याचा कधी द्वेष केला नाही, मला त्यांच्याबद्दल नेहमीच अभिमान वाटला असे सांगून ते पुढे म्हणाले बँकेत नोकरी करताना आपण समाजाचे काहीतरी देने लागतो या भावनेतून काम केल्याचे ते म्हणाले. शेवटी सुरज गवंडी यांनी आभार मानले यावेळी बँक प्रशासनाच्या वतीने तसेच बँक कर्मचारी संघटना आणि अधिकारी वर्गाकडून श्री. प्रभूवालावलकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
