केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हयाचा पर्यटनातून विकास साधण्यासाठीच हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला होता. मुलभूत सुविधा देखील आपण मंत्री व मुख्यमंत्री असताना निर्माण केल्या आहेत. पर्यटन हाच जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून पर्यटनातून विकास व आर्थिक परिवर्तन होऊन जिल्हा वासीयांना चांगले दिवस पहायला व अनुभवायला मिळतील. पर्यटन विकासाच्या दृष्टीने जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने हाती घेतलेले कार्य स्तुत्य असून हा वसा असच चालू ठेवून जगाच्या नकाशावर सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आणूया असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थित राहू न शकल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चित्रफिती द्वारे आपला संदेश पाठविला होता. शुभ संदेशात ना राणे यांनी म्हटले आहे की, पर्यटन विकासातून जिल्ह्यातील लोकांच्या जीवनाचे परिवर्तन घडेल, आर्थिक सक्षमता येईल, तसेच नवीन पिढीला विकासाचा मार्गही सापडेल, यादृष्टीनेच आपण पर्यटन जिल्हा बनविला होता. पर्यटन व्यावसायिक महासंघाने हाती हाती घेतलेले कार्य जिल्ह्याच्या विकासासाठी असून त्यातून सर्वांना स्फूर्ती, प्रेरणा आणि नवी दिशा मिळेल येत्या ९ ऑक्टोबरला चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत असून जिल्हा वासीयांच्या जीवनामध्ये ही विशेष बाब आहे पर्यटनाच्यादृष्टीने जिल्ह्यात विमान उतरणे आणि टेक ऑफ घेणे ही आनंदाची गोष्ट आहे. आपण मंत्री असताना चिपी विमानतळाच्या जमीन संपादन करण्याचे काम सुरू केले होते, तेव्हा काहीजण विरोधाला उभे होते. लोकांना भडकावून जमिनी देऊ नका असे सांगून आंदोलन करत होते. तेच लोक आता विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी नटताहेत याचे आश्चर्य वाटते, अशी जळजळीत टीकाही केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केली.
