मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या ऑनलाईन रेसिपी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कलमठ येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सौ. आरती मकरंद वायंगणकर- कांबळी यांच्या कोकणातील रस खापरोळी रेसिपीला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आरती वायंगणकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील खाद्यसंस्कृतीला आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राचे मास्टरशेफ या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आपल्या आवडत्या महाराष्ट्रीयन डिशच्या रेसिपीचा व्हिडीओ ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा होता. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कलमठ येथील रहिवासी सौ.आरती मकरंद वायंगणकर – कांबळी यांनी कोकणातील रस खापरोळी रेसिपीचा व्हिडीओ पाठविला होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातून साधारणपणे एक हजारच्या वर रेसिपी व्हिडीओ प्राप्त झाले होते. या सर्वांमधून आरती यांच्या कोकणातील रस खापरोळी या रेसिपीला द्वितीय क्रमांक देण्यात आला. जागतिक पर्यटन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती वायंगणकर- कांबळी यांना गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य स्तरावर आरती यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्राचे मास्टर शेफ ऑनलाईन रेसिपी स्पर्धेत कणकवलीच्या आरती वायंगणकर द्वितीय
