स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय गुणवत्ता कक्षातर्फे ‘पर्यटन सप्ताह’

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत यांनी दिली माहिती

*⚡मालवण ता.२५-:* सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसाय उत्तमरित्या आकाराला आला आहे. उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा मेळ साधत जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा. त्यात धोरणात्मक योगदान देता यावे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. विद्यार्थी आणि समाजामध्ये पर्यटन व्यवसायाविषयी आणि शाश्‍वत, जबाबदार पर्यटनाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या गुणवत्ता कक्षाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘पर्यटन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रा. एम. आर. खोत, प्रा. बी. एच. चौगुले आदी उपस्थित होते. डॉ. सामंत म्हणाल्या, पूर्वीपासून महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात होता. मात्र यात समाजाला सहभागी करून घेण्याबरोबरच पर्यटन व्यवसायात सहभागी सर्व व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. येथील पर्यटन विकासात महाविद्यालयाचे भविष्यात भरीव योगदान राहील यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. यावर्षीपासून दरवर्षी हा पर्यटन सप्ताह महाविद्यालयाच्या वतीने साजरा केला जाणार आहे. २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होईल. याच दिवशी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये सहभागी होऊ शकतील. २८ सप्टेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यात महाविद्यालयाचे एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, प्राध्यापर्क वर्ग, शहरातील विविध सामाजीक संस्था सहभागी होणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संबंधित स्पर्धकांनी सायंकाळी सहा वाजेपर्यत रांगोळीचे छायाचित्र, व्हिडीओ मोबा ९४०४३८८११८ या क्रमांकावर पाठवायचे आहेत. यातील विजेत्यांना अनुक्रमे १००० रुपये, ८०० रुपये , ५०० रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पर्यटन या विषयावर ऑनलाईन प्रश्‍नमंजुषा स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल. १ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पर्यटनातील नाविन्यपूर्ण पद्धती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात तज्ज्ञ मार्गदर्शक व्हिसेंट रामोस हे मार्गदर्शन करणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी किल्ले निवतीला भेट देत स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या किल्ल्याच्या डागडुजी तसेच अन्य समस्यांबाबतही यावेळी उहापोह केला जाणार आहे. याच दिवशी आशिष राऊळ हे या किल्ल्याचे महत्त्व सांगणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी तारखेला या पर्यटन सप्ताहाचा समारोप महाविद्यालयात होणार असल्याची माहितीही डॉ. सामंत यांनी यावेळी दिली.

You cannot copy content of this page