*⚡बांदा दि.२३-:* ई-पीक नोंदणीचे फायदे शेतकऱ्यांना भविष्यात अनेक आहेत. नैसर्गिक आपत्ती, पिक कर्ज, विमा आदी लाभ घेण्यासाठी शासनाकडे या नोंदीमुऴे खातेनिहाय व पीकनिहाय डाटा उपलब्ध होणार आहे. नुकसान टाळण्यासाठी खातेदारांनी दिलेल्या कालावधीत नोंदणी न केल्यास ते लागवडीचे क्षेत्र पड दिसणार असून त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असल्याने नोंदणी करण्याचे आवाहन मडुरा तलाठी विजय कविटकर यांनी शेतकऱ्यांना केले. पाडलोस ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी व नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. तलाठी कविटकर म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर पाहणी अॅप डाऊनलोड करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत त्यांनी इतर मोबाईलवरून आपल्या शेतीची माहिती भरून नोंदणी करता येईल. एका मोबाईलवरून वीस खातेदारांच्या नोंदणी करणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी माहिती भरल्यानंतर तलाठी सदर माहिती तपासणार व त्यानंतर अद्यावत करणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. त्यापूर्वी पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक आहे. दिलेल्या कालावधीत नोंदणी न केल्यास ते लागवडीचे क्षेत्र पड दिसणार आहे आणि त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. जमीन पड दिसल्यास शासनाच्या अनुदानाचा लाभ घेताना मर्यादा येणार आहेत. प्रगतशील शेतकरी व युवा पिढीतील शेतकऱ्यांनी या योजनेत पुढाकार घ्यावा व गावातील शेतकरी पीक नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही श्री.कविटकर यांनी केले. राजू शेटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
पाडलोसमध्ये ई-पीक पाहणी नोंदणीस प्रारंभ
