भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब
*⚡मालवण ता.२२-:* महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी वीज बिल माफ होणार असल्याची घोषणा केल्यानेच वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेली नाहीत. त्यामुळे अचानक तुम्ही हजारो, लाखो रुपयांची बिलं काढलात तर ग्राहक ही वीज बिलं भरणार कुठून ? त्यातच वीज बिलाला व्याज कसले लावता ? वीज बिल पाचशे रुपये आणि व्याज १ हजार रुपये हा काय प्रकार आहे या आणि इतर प्रश्नांची सरबत्ती करीत आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला दरम्यान, वीज वितरण कंपनीने यापुढे एका जरी ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केल्यास वीज वितरणवर मोर्चा आणण्याचा इशाराही भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. गणेश चतुर्थी संपताच वीज वितरणने वीज बिल वसुलीचा सपाटा सुरू केला आहे. वीज बिल न भरणा केल्यास वीज वितरणकडून ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. वीज वितरणच्या एक कलमी मोहिमे विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज वितरणमध्ये धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, अनिल कांदळकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, बाबा परब, आदी उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वच व्यावसायिक संकटात आले आहेत. असे असताना वीज वितरण ग्राहकांकडे वसुलीच्या मागे लागली आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्याच दिवसापासून महावितरणने वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. काही ग्राहकांनी गणेश चतुर्थी पूर्वी महावितरणची थकीत बिलांतील अर्धी रक्कम भरणा केली असतानाही अशा ग्राहकांना देखील उर्वरित रक्कम तात्काळ भरा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण वीज बील तात्काळ न भरल्यास वीज कनेक्शन तोडता हे खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला
