*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील बर्डे वाडी ते पेडणेकर वाडीत जाणाऱ्या रस्त्याची पेडणेकर वाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून डागडुजी करत पूर्ण केला. तळवणे येथील बर्डे वाडी ते पेडणेकर वाडीत जाणारा रस्ता हा दरवर्षी पावसाळ्यात चिखलमय होऊन रस्त्यावर सगळीकडे जागोजागी खड्डे पडलेले असतात. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र संबंधित खात्याचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मात्र अखेर याची दखल येथील ग्रामस्थांनी घेत हा रस्ता स्वखर्चातून श्रमदान करून पूर्ण केला. या रस्त्यामुळे दरवर्षी होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करून योग्य असा रस्ता कायमस्वरूपी व्हावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने होत आहे. पेडणेकर वाडीतील ग्रामस्थ दरवर्षी ह्या रस्त्यासाठी अंगमेहनत करून स्वखर्चाने ह्या रस्त्यासाठी श्रमदान करून हा रस्ता दुरुस्त करत असतात. ग्रामस्थांनी श्रमदान करून केलेले काम हे इतरांना सुद्धा एक आदर्शवत असे काम आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तळवणे-पेडणेकर वाडीत जाणाऱ्या रस्त्याची ग्रामस्थांनी श्रमदानातून केली डागडूजी
