दिलेल्या आश्वासनाकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष : ग्रामस्थांचा आरोप
*⚡बांदा ता.१७-:* मडुरा-सातोसे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुलाजवळ मडुरा गावातील गणेश मूर्त्यांचे विसर्जन करतात. पाण्यात उतरणीच्या वाटेवरच भलामोठा खड्डा पडल्याने विसर्जन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. उपोषणावेळी अधिकाऱ्यांनी खड्डा बुजविण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरल्याने गणरायाच्या विसर्जनात खड्ड्याचे विघ्न असून येत्या दोन दिवसात सदर खड्डा न बुजविल्यास अधिकाऱ्यांना थेट कार्यालयात जात घेराव घालणार असल्याचा इशारा, भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य बाळू गावडे यांनी दिला आहे. माऊली मंदिर पुलाजवळ गावातील गणेश मूर्त्यांचे एकत्रित विसर्जन करण्यात येते. सदर पूल वाहतुकीस धोकादायक असून पाण्यात उतरणीच्या वाटेवर धोकादायक खड्डा पडला आहे. त्यामुळे विसर्जनावेळी अपघात होऊन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे बाळू परब यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करत धोकादायक खड्डा बुजविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्याही आदेशाला केराची टोपलीच दिल्याने भाविक व ग्रामस्थांसह कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. येत्या दोन दिवसात सदर धोकादायक खड्डा न बुजविल्यास थेट कार्यालयात जात अधिकाऱ्यांनाच घेराव घालणार असल्याचा इशारा बाळू गावडे यांनी दिला.
