विधी सेवा समिती मालवणच्या वतीने पंचायत समिती येथे कार्यक्रम संपन्न
*⚡मालवण ता.१७-:* न्याय सर्वांसाठी, न्यायालय आपल्या दारी या संकल्पनेतून विधी सेवा समिती मालवण व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाले. प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. देशभर राबवले जात असलेल्या स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेची शपथ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी घेतली. मालवण पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात विधी सेवा समिती मालवणचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश, सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव,ऍड सुदर्शन गिरसागर, ऍड अमृता मोंडकर, ऍड अक्षय सामंत, ऍड सुमित जाधव यासह न्यायालय कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते. नालसा लीगल सर्व्हिस अँपच्या माध्यमातून तसेच अन्य स्वरूपात व्हिडीओ सादरीकरणातून उपस्थिताना माहिती देण्यात आली. मालवण पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार कार्यालय, बसस्थानक तसेच ग्रामपंचायत रेवंडी, वायरी-भूतनाथ, आचरा, चिंदर, हडी या ठिकाणीही विधी सेवा समितीच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाले. गरीब जनतेला कायद्याबाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने विधी सेवा समितीच्या वतीने तालुकास्तरावर काम सुरू आहे. तरी जनतेला काही माहिती, मार्गदर्शन लागल्यास त्यांनी विधी समितीशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले.
