मालवण दि प्रतिनिधी मानव संसाधन विकास संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत असून या संस्थेचे देशातील पहिले जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झाल्यावर २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही नवीन उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून जनशिक्षण संस्थान स्थापन करण्यात आले असून या संस्थानची दोन्ही जिल्ह्यात पाच गावामागे एक अशी ४५० परिवर्तन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. रोजगार उपलब्ध करून देणारे विविध उपक्रम राबविणाऱ्या जनशिक्षण संस्थानकडून आंबा, कोकम आदी प्रकारचा शेतमाल खरेदी व तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गणेशोत्सवानिमित्त मालवण मेढा येथील आपल्या निवासस्थानी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री खास. सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मानव संसाधन विकास संस्था व जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग या संस्थांच्या माध्यमातून झालेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू, माजी आमदार विनय नातू आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश प्रभू म्हणाले, सिंधुदुर्ग प्रमाणे रत्नागिरी येथेही जनशिक्षण संस्थान सुरू करण्यात येत असून त्याच्या अध्यक्षपदाची धुरा माजी आमदार विनय नातू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शारीरिक, अध्यात्मिक, बौद्धिक व पर्यावरण विकास साधण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात असून यास सरकार कडून अनुदान मिळत आहे. या संस्थेमार्फत आतापर्यंत ६५ हजार तरुण, तरुणी व महिलांना विविध प्रकारची प्रशिक्षणे देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलं आहे. २६०० महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन देण्यात आले आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सायकल उपलब्ध करून देऊन हा उपक्रम सामाजिक दृष्ट्या राबविण्यासाठी सायकल बँक ही संकल्पना राबविली जात आहे. या उपक्रमाची देशस्तरावर दखल घेतली आहे. वॉटरस्पोर्ट्स प्रशिक्षण कार्यक्रम राबवून १२० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. महिला, तरुण- तरुणी, शेतकरी, मच्छीमार, माजी सैनिक यांच्यासाठी जनशिक्षण संस्थान विविध उपक्रम राबवित आहे, असेही सुरेश प्रभू म्हणाले. कोकणातील पहिले नर्सिंग कॉलेज अणाव येथे जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातूनच उभारण्यात आले असून त्याचे पुढचे पाऊल म्हणून या कॉलेजची भव्य इमारत बांधण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात या कॉलेजची विद्यार्थी संख्या ६०० पर्यंत पोहोचणार आहे. यात पॅरामेडिकल कोर्सेसही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहितीही यावेळी सुरेश प्रभू यांनी दिली.
तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – खा. सुरेश प्रभू
