राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* सुंदर व निसर्गसंपन्न जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेला मुंबई विद्यापीठाचा सिंधुदुर्ग उप परिसर हा आदर्श असा व्हावा असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे आज राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सावंतवाडी येथे ऑनलाईन उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे सिनेट मेंबर हे ऑनलाईन उपस्थित होते. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बाळाराम गायकवाड, सिंधुदुर्ग उप परिसराचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे हे उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात होत असलेले नवीन परिसराचे उद्घाटन हे आनंद देणारे असल्याचे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील हा नवीन उदय आहे. या जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. अशा निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण झाले तर त्याला वेगळेच महत्व प्राप्त होते. हा महत्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. या उप परिसरास प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याविषयीही नक्कीच विचार केला जाईल. लवकरात लवकर या उप परिसरासाठी जागा व इतर सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या जातील, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, कोकणवासियांचे आणखी एक स्वप्न या उप परिसराच्या रुपाने पूर्ण होत आहे. तसेच जिल्ह्यात लवकरच प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील पहिले कोस्टल विद्यापीठही जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री. पेडणेकर यांनी प्रस्तावना करून सर्वांचे स्वागत केले. तर कुलसचिव श्री. गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगांवकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, संजय पडते, स्ट्रिमकास्ट एज्युकेशनचे संचालक हर्षवर्धन साबळे आदी उपस्थित होते.
