तळाशीलच्या प्रश्नांबाबत मेघनाद धुरी यांनी वेधले महसूल, बांधकाममंत्र्यांचे लक्ष

*⚡मालवण ता.१२-:* काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी तळाशील धूप प्रतिबंधक बंधाराप्रश्नी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे, तर खाडीतील वाळू उत्खनाबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले. काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांमार्फत हे दोन्ही विषय मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही धुरी यांनी तळाशील ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांना दिली आहे. बंधारा व वाळू उत्खनन याबाबत १५ ऑगस्ट रोजी तळाशील ग्रामस्थांनी गावात उपोषण केले होते. तात्काळ धूप प्रतिबंधक बंधारे घातले न गेल्यास गावाचे दोन तुकडे होऊन जगाच्या नकाशावरून तळाशीलवाडीचे अस्तित्व नष्ट होईल, अशी भीती ग्रामस्थांनी त्यावेळी व्यक्त केली होती. गावानजीकच्या खाडीत होणारे वाळू उत्खनन बंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांना निवेदने सादर करण्यात आली. आचरा जामडुलवाडी बेटाला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. समुद्र आणि खाडीचे पाणी संपूर्ण बेटावर आल्याने तेथील रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. कित्येक विहिरींचे पाणी खारवटलेले. ‘जामडुल बेटाच्या दक्षिण दिशेस एका बाजूला थोडासा बंधारा घातलेला आहे. परंतु या बेटाच्या संरक्षणासाठी संपूर्ण बंधारा होणे आवश्यक आहे. याकडेही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आल्याचे मेघनाद धुरी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page