वैभववाडीत नियमांची पायमल्ली करून कामे होत असल्याचा मनसेचा आरोप

मलीदा कोण खाते व कामे कशी बोगस होतात हे जाहीर करणार:सचिन तावडे

*⚡वैभववाडी ता.०८-:* गेल्या आठ नऊ महिन्यापासून नगरपंचायत येथील प्रशासक म्हणून आपण काम पाहात आहात. प्रशासकाची भूमिका बजावताना तुमचे अधिकारी कुठेतरी कमी पडताना दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आपला अंकुश जाणवत नाही. वाभवे हे गाव इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रात येत असताना देखील येथे खाजगी विकास मोठ्या प्रमाणात खोट्या परवानग्या घेऊन तसेच नियमांची पायमल्ली करून होत असल्याचे दिसून येते. इमारतीची परवानगी घेताना ब्लू प्रिंट एक व प्रत्यक्षात बांधकाम वेगळ्या पद्धतीने शिवाय काम पूर्ण नसताना त्यांना ओ. सी. मिळते. सदर कामाचा मलीदा कोण खात आहे व ही कामे कशी बोगस आहेत, हे काही दिवसांतच आम्ही जाहीर करु, असे मनसे तालुकाध्यक्षांनी म्हटलं आहे. वैभववाडी शहरात गेले काही दिवस नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. मोटर पंप बिघाड झाल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुळात दि.२०-०७-२०१९ आणि १७-०९-२०१९ रोजी नगरपंचायतीने सुमारे ८६ हजार ७७२ रुपये खर्च करून दोन पाण्याचे सबमर्सिबल पंप विकत घेतले. मग ते गेले कुठे ? याची उत्तरे देखील जनतेला मिळायला हवी. वैभववाडी शहरातील बाजारपेठेत गटारांचे नियोजन नसल्याने जागोजागी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यात साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका आहे. नगरपंचायतमध्ये पडून असलेली थर्मल फॉगिंग मशीन कधी वापरात येणार, याची देखील जनता वाट पाहत आहे. बाजारपेठेतील एकमेव सुलभ शौचालयाची अवस्था न सांगितलेली बरी.! स्वच्छतेसाठी मोटर पंप घेतल्याचे दिसते. पण स्वच्छतेच्या नावाने बोंब, दर महिन्याला सफाई कामगारांवर हजार रुपये खर्च होतात. पण प्रत्येक विभागात कचऱ्याचे ढीग तसेच दिसत आहेत. जागोजागी झाडी वाढल्याचे दिसते. कामाचे नियोजन शून्य आहे. तसेच कचरा उचलणाऱ्या वाहनांवरील कर्कश आवाजात ध्वनिफीत शहरातील शाळा महाविद्यालये यांच्या परीसरात वाजवली जाते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण तर होत आहेच. शिवाय बालकांच्या बालमनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ती ध्वनिफीत त्वरित बंद करून घंटानाद करण्यात यावा, अशी विनंतीवजा सुचना मनसे अध्यक्षांनी केली आहे. पालकमंत्री यांनी दिलेल्या निधीचा नियोजनशून्य वापर होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. बारा कामापैकी आठ कामांची निविदा ११ पॉईंट ८४ टक्के ने कमी भरण्यात आली. यावरून होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे; पण यामध्ये असे दिसते, की ही कामे वाढीव दराने दाखवण्यात येत आहेत. म्हणून इंजिनियर आणि त्यांच्या कार्यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. आपण दुसऱ्या इंजिनिअरकडून सदरील कामाची निविदा तयार करावी. नवीन निविदा प्रक्रिया करण्यात यावी. आम्हाला तसेच नगरपंचायत येथील नागरिकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपण त्या पूर्ण कराल, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी प्रांत अधिकारी कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनसेचे वैभववाडी तालुका पदाधिकारी देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page