मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेसाठी नगरविकास विभागातर्फे २५ लाखाचा निधी

आमदार वैभव नाईक यांनी केली वचनपूर्ती:महेश कांदळगावकर

*⚡मालवण ता.०७-:* मालवण शहरातील नगरपालिकेच्या व्यायामशाळेला अत्याधुनिक साहित्य मिळावे यासाठी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आमदार नाईक यांनी वचनपूर्ती करत नगरविकास विभागाच्यावतीने २५ लाख रुपयांचा निधी नगरपालिकेस उपलब्ध करून दिला आहे. याबाबतची माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली मालवण नगरपालिकेच्या ग्रामीण रुग्णालयानजिक दहा वर्षापूर्वीपासून व्यायामशाळा सुरु आहे. मालवण मधील अनेक जण या व्यायाम शाळेत व्यायाम करत आहेत. तसेच या शाळेतील अनेक व्यायामपटूंनी शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेवून बक्षीसेही मिळवली आहेत. मालवण शहरात गुणवत्ता आहे पण व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य नसल्याने मोठ्या स्पर्धेत भाग घेताना अडचणी येतात. या व्यायामपटूंनी सुद्धा जास्तीत जास्त अत्याधुनिक व्यायाम साहित्य मिळावे जेणेकरुन चांगल्या स्पर्धेत सुद्धा भाग घेता येईल अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली होती. त्यानुसार नगराध्यक्षांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार श्री. नाईक यांनी हा निधी देण्याबाबत आश्वासित केले होते. या मागणीनुसार आज नगर विकास विभागाच्या आदेशानुसार २५ लाख रुपये व्यायामशाळेतील साहित्यासाठी मालवण पालिकेला मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मालवण शहरात पालिकेमार्फत एक अत्याधुनिक व्यायामशाळा लवकर सुरु होईल. व्यायामशाळेसाठी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार वैभव नाईक यांचे मालवणच्या जनतेच्यावतीने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page