दोन वर्षापूर्वी २१ टन पावसाळी डांबर आणले ते गेले कुठे…?

माजी आम.परशुराम उपरकर यांचा सवाल; जांभ्या दगडाने खड्डे बुजवण्याचे आश्वासन

कणकवली 7 सप्टेंबर (प्रतिनिधी)- गणेश चतुर्थी आली तरी रस्ते खड्डेमय आहेत, सातत्याने खड्डे बुजविण्याची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केला गेला. गेल्या पंधरा दिवसात पाऊस कमी असताना पावसाळी डांबराने खड्डे बुजवण्याची गरज असताना जांभ्या दगडाने खड्डे का बुजवता? गेल्या दोन वर्षापूर्वी २१ टन पावसाळी डांबर आणले ते गेले कुठे?असा सवाल मनसे नेते परशुराम उपरकर यांनी कार्यकारी बांधकाम अभियंता संजय शेवाळे यांना केला. त्यावर आता पुढील काळात पावसाळी डांबराने खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष दयानंद मेस्त्री, संतोष सावंत, गणेश पारकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फोंडा, कणकवली आचरा, कनेडी, बिडवाडी, कासरल,विजयदुर्ग या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही रस्ते जांभ्या दगडाने भरण्यात येत आहेत,मात्र त्याचा उपयोग होत नसल्याची बाब कार्यकारी अभियंता यांना लक्षात आणून देण्यात आली.त्यामुळे पावसाळी डांबराने खड्डे बुजवून प्रवाशांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी दया मेस्त्री यांनी केली. आपल्या कार्य क्षेत्रात असलेली जुनी फुले आहेत त्याचे मशिनद्वारे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून फूल कोसळण्याचा धोका उद्भवणार नाही. तसेच रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढ झालेली आहे. ती झाडी झुडपे तोडण्यात यावी अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात श्री.गवळी यांनी झाडी तोडण्याबाबत मिळणारा मोबदला कमी आहे, कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे निकष बदलण्याची मागणी करून झाडी तोडण्याबाबत जादा निधी देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच गेल्या वर्षभरात ४० कोटीची विकास कामे झाली आहेत. मात्र केवळ २ टक्केच निधी आहे. खड्डे बुजवण्यासाठी किंवा अन्य निधी देखील प्राप्त झाले नसल्याचे श्री. शेवाळे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page