घरात पुराचे पाणी गेलेल्या ११३ कुटुंबांना धान्यासह आर्थिक मदत

कणकवलीतील पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर ​८ लाख ​५० हजार रुपये जमा

​​ *⚡​कणकवली दि.०७-:* कणकवली तालुक्यातील ११ गावांतील ११३ कुटुंबे अतिवृष्टीमुळे बाधित झाली होती. त्या सर्वांना प्रत्येक कुटुंब ​७ हजार ​५०० या प्रमाणे एकूण ८ लाख ४७ हजार ५०० रुपयांची मदत आणि प्रत्येकी पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ आणि पाच लिटर रॉकेल चा पुरवठा शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती तहसीलदार आर​.​ जे​. ​ पवार यांनी दिली. अतिवृष्टीमुळे यावर्षी जुलै महिन्यात पुराचे पाणी घरात घुसल्याने नुकसान झालेल्या कणकवली तालुक्यातील कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक आणि धान्य स्वरूपात मदत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ही मदत संबंधित नुकसानग्रस्त यांच्या हाती आली आहे. जिल्ह्यात १६ ते २४ जुलै या दरम्यान अतिवृष्टी झाली होती. यात कणकवली तालुक्यातील वागदे, खारेपाटण सह एकूण ​११ गावांतील अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले होते. अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला होता. तर साठवलेले धान्यही भिजल्याने ते नासाडी झाले होते. कणकवली शहरातील निम्मेवाडी येथील कातकरी कुटुंबांच्या ७ झोपड्याही पुरात बाधित झाल्या होत्या. या सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्‍यानंतर महसूल विभागाकडून या सर्व नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक आणि धान्य स्वरूपात मदत करण्यात आल्‍याची माहिती कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी दिली. कणकवली तालुक्‍यातील ​११ गावांतील ११३ कुटुंबे आणि त्‍यामधील ४४६ व्यक्‍ती पूरामुळे बाधित झा​ल्या होत्‍या. या सर्व कुटुंबांना मागील आठ दिवसांत प्रत्‍येकी पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, पाच लिटर रॉकेल तसेच प्रत्‍येकी ७ हजार ५०० रूपयांची मदत या कुटुंबांच्या बँक खात्‍यावर जमा करण्यात आली आहे. तालुक्‍यात एकूण पुरग्रस्तांना ८ लाख ४७ हजार ५०० रूपयांची मदत बँक खात्‍यावर जमा करण्यात आली. तर एकूण ११३० किलो गहू आणि तेवढेच तांदूळ तसेच ५६५ लिटर रॉकेल पुरवठा देखील या सर्वांना करण्यात आला. दरम्‍यान कणकवली शहरातील सात कातकऱ्यांच्या झाेपड्या बाधित झाल्या होत्या. यातील सात कुटुंबातील २१ जणांची तात्‍पुरती व्यवस्था पिसेकामते येथे करण्यात आली. या कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले आहे. मात्र या कुटुंबातील कोणाचेच बँक खाते नसल्‍याने आर्थिक मदत जमा करता आलेली नाही. त्‍याअनुषंगाने या कातकरी बांधवांचे पालकत्व घेतलेले अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांना या कातकरी बांधवाची बँक खाती काढण्याची विनंती केली आहे. त्‍यांची बँकखाती काढल्‍यानंतर लगेच आर्थिक मदतही त्‍यांच्या खात्यावर जमा होणार असल्‍याची माहिती ​​तहसीलदार पवार यांनी दिली. गणेश चतुर्थीच्या पूर्वी या पूरग्रस्तांच्या स्टेट बँक खात्यावर आर्थिक मदत व धान्य जमा झाल्याने पूरग्रस्तांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. ​​

You cannot copy content of this page