अखेर बिडवाडी गावाला मिळाला कायमस्वरूपी वायरमन

ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचे कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन

*⚡कणकवली ता.०७-:* बिडवाडी गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा, स्वतंत्र वायरमन नसणे आदी विविध मुद्दयांवर आक्रमक होऊन बिडवाडी ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्‍यांपुढे प्रश्‍नांची सरबत्ती केली. तसेच वायरमन मिळेपर्यंत तुमच्या केबिनमधून उठणार नाही असे सांगत ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी बिडवाडी गावासाठी स्वतंत्र वायरमन देण्याची ग्‍वाही दिली. व ग्रामस्थांच्या उर्वरित मागण्या देखील लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही दिली तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिल्‍यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. बिडवाडी सरपंच सुदाम तेली यांच्या नेतृत्‍वाखाली बिडवाडीतील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात धडक दिली. बिडवाडी गावात गेले वर्षभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच विजेचा दाब कमी जास्त होत असल्‍याने वीज उपकरणे खराब झाली आहेत. स्वतंत्र वायरमन नसल्‍याने वीज तारा तुटल्‍या किंवा अन्य काही समस्या उद्‌भवली तर दोन ते तीन दिवस ग्रामस्थांना काळोखात काढावे लागतात. त्‍यामुळे आमच्या समस्या सुटेपर्यंत आम्‍ही आंदोलन सुरू ठेवणार तसेच वीज बिले देखील भरणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. बिडवाडी ग्रामस्थांचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी बिडवाडी गावासाठी स्वतंत्र वायरमन दिला जाईल अशी ग्‍वाही दिली. पुढील दोन दिवसांत महावितरणचे पथक बिडवाडी गावात येऊन वीज तारांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू करेल. मात्र, त्‍यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन मोहिते यांनी केले. तसेच वीज दुरूस्ती पथक पाठवून गावातील वीज समस्या सोडवू अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. गेले सहा महिने आम्‍ही वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत. पण आमच्या एकाही पत्राला महावितरणकडून उत्तर देण्यात आलेले नाही अशी खंत सरपंच सुदाम तेली यांनी मांडली. दरम्‍यान, जोपर्यंत बिडवाडी गावाचा वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोवर गावातील एकही ग्रामस्थ वीज बिल भरणार नाही असा इशाराही यावेळी सरपंच तेली यांच्यासह ग्रामस्थांनी दिला. यावेळी ग्रामस्थ दादा भोगले, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव साटम, रमेश जांभवडेकर, गणेश चव्हाण, उमेश लाड, पांडुरंग मगर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page