विजेत्या ग्रामपंचायतला लाखाचे बक्षीस अध्यक्षा संजना सावंत, सीईओ नायर यांची माहिती
*⚡ओरोस ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होण्याकरीता, तसेच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, जलजिवन मिशन, पर्यावरण पुरक गणेशोत्सव या उपक्रमांना ग्रामपंचायत स्तरावर गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्हास्तरीय स्वच्छ, पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा 2021-2022 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतीनां अनुक्रमे प्रथम क्रमांक 1 लक्ष रुपये, द्वितीय क्रमांक 60 हजार रुपये, तृतिय क्रमांक 40 हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी संयुक्त दिली आहे. अध्यक्ष दालनात 6 सप्टेंबर 2021 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर होते. जिल्हास्तरीय स्वच्छ, पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा 2021-2022 मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रमपंचायतीनी सहभाग घेणे अनिवार्य असुन या स्पर्धेचा फायदा हागणदारी मुक्त अधिक (ODF+), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास मोठ्याप्रमाणावर होणार आहे. या स्पर्धेकरीता गुण पत्रिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीनी गणेश उत्सव काळात वार्ड निहाय राबविलेल्या स्वच्छता उपक्रमांसाठी 10 गुण, गावातील पर्यावरण पुरक बाप्पाच्या संख्येला 5 गुण, गावातील पर्यावरण पुरक बाप्पा असणा-या घरात पर्यावरण पुरक आरासाचा संख्येस 10 गुण, गणेश विसर्जन ठिकाणी करण्यात आलेली स्वच्छ्ता 10 गुण, गणेश उत्सव काळात तयार होणा-या निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजना करीता 10 गुण, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावात वैयक्तिक स्तरावर तयार करण्यात आलेले खतखड्डे व शोषखड्डे या करीता 10 गुण ठेवण्यात आले आहेत. तसेच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावात सार्वजनिक स्तरावर तयार करण्यात आलेले खतखड्डे व शोषखड्डे या करीता 5 गुण, प्लॉस्टिक संकलन शेड करीता 5 गुण, कचरा उचलण्याकरीता ट्राय सायकल घेतली असल्यास 5 गुण, गावात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नाविण्यपुर्ण काम केले असल्यास 10 गुण, गावात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छता संदेश रंगविण्यात आले असल्यास 5 गुण, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्यास 5 गुण, जलजिवन मिशन आराखडा तयार करुन कोबो प्रणालीवर ऑनलाईन केल्यास 5 गुण, जलजिवन मिशन अंतर्गत गावात नळजोडनी दिली असल्यास 5 गुण अशी 100 गुणाची तपासनी या स्पर्धे दरम्यान होणार आहे. जिल्हास्तरीय स्वच्छ, पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा 2021-2022 या स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतीनां अनुक्रमे प्रथम क्रमांक 1 लक्ष रुपये, द्वितीय क्रमांक 60 हजार रुपये, तृतिय क्रमांक 40 हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पारितोषिक प्राप्त ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पर्यावरन पुरक गणपती बाप्पा व पर्यावरण पुरक आरास असणाऱ्या कुटुंब प्रमुखांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घेणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत तालुकास्तरावर उत्कृष्ठ काम करणा-या दोन ग्रामपंचायती मधुन जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय स्वच्छ, पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा 2021-2022 स्पर्धेचे ग्रामपंचायत स्तरावर आयोजन करीत असताना कोविड19 चे सर्व नियमांचे पालन करावे असे हि यावेळी सांगितले आहे.
