*⚡कणकवली ता.०६-:* शिक्षक हा समाजाचा खऱ्याअर्थाने अभियंता असतो. संस्कृती रक्षण व संवर्धनाचे कार्य अव्याहतपणे शिक्षक पार पडतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय सेवेचे संस्कार,रोजगार निर्मिती मूल्य संस्कार, सामाजिक समस्यांचे निवारण करण्यासाठी लेखन व संशोधन त्याचबरोबर युवा देशाला घडवणारे,तसेच संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षक सातत्याने पार पडतात. ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होतो तो देश श्रेष्ठ मानला जातो असे स्पष्ट प्रतिपादन आजगाव येथील विद्या विकास अध्यापक महाविद्यालयातील ज्येष्ठ अभ्यासक रुपेश पाटील यांनी व्यक्त केले. कणकवली महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘शिक्षकांची सामाजिक बांधिलकी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. अनिल फराकटे होते . सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. लालासाहेब घोरपडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हरीभाऊ भिसे उपस्थित होते. यावेळी डॉ.लालासाहेब घोरपडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चरित्र व कार्याची सविस्तर माहिती दिली. डॉ. राधाकृष्णन हे शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांनी देश-विदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार केला. विद्यार्थ्यांना दैवत बनणारे डॉ. राधाकृष्णन त्यांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे ते म्हणाले. संवैधानिक मूल्यांचे जतन हवे अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना डॉ.अनिल फराकटे यांनी आजची शिक्षण व्यवस्था, शिक्षकांची स्थिती, शैक्षणिक चिंतन यावर चिंतनशील भाष्य केले. आज समाजातील शिक्षकांचा दर्जा काही प्रमाणात नकारात्मक दिसून येतो तो तो सकारात्मक पद्धतीने समाजाने समजून घेतला पाहिजे.त्याचबरोबर शिक्षकाने सामाजिक बांधिलकीच्या उमाळ्याने उथळ प्रसिध्दी बाजूला सारुन महामानवांच्या विचारांचे अधिक चिंतन करावे, देशातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घुसमट , परिस्थितीवरही भाष्य करून आपण समाजाचा एक जबाबदार घटक आहोत हे दाखवून दिले पाहिजे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सोमनाथ कदम यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्रा. युवराज महालिंगे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.बी.एल.राठोड यांनी केले.या प्रसंगी प्रा. तेजस जयकर,प्रा.अरविंद उमरीकर,प्रा. प्रा. सुरेश पाटील ,प्रा.मारोती चव्हाण उपस्थित होते.
समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो:प्रा.रुपेश पाटील
