गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश शाळांमध्ये लगबग

गणेशभक्तांची घरोघरी गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु

*⚡सावंतवाडी ता.०६-:* ‘विघ्नहर्त्या गणपतीचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश शाळांमध्ये लगबग वाढली असून गणेश मूर्ती रंगकामात सर्वच शाळातील मूर्तिकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी ‘विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. या सणानिमित्त घराबाहेर असलेले सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याची रितच प्रत्येक घरात पहायला मिळते. गणेश चतुर्थी सणाची पूर्वतयारी ही सर्व शाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यापासून सुरु होते. तशी यावर्षीही ती सुरु झाली. आता गणेश मूर्ती पूर्ण झाल्या असून रंगकाम हे जवळजवळ अंतीम टप्प्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यासह शहरांमधील मूर्ती शाळांमध्ये धावपळ दिसून येत आहे. तसेच गणपतीच्या स्वागतासाठी सर्व घर अगदी उजळून निघण्यासाठी वेळ मिळेल तसा घराघरांमध्ये साफसफाईच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे जिकडे तिकडे घराची झाडलोट व रंगकाम करण्यात लोक गुंतले असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनारुपी ‘विघ्न‘ या सणासमोर उभे ठाकले आहे. यंदाही कोरोनामुळे सर्वांचा कामगार कपात, बंद पडलेले व्यवसाय, पगारातील कपात यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. तरीही गणपतीचे पूजन करायचे, त्याच्या सेवेत काहीही कमी पडू द्यायचे नाही यासाठी भक्तमंडळींचे प्रयत्न सुरु आहेत.

You cannot copy content of this page