उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे यांचा इशारा
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषद मच्छिमार्केटची जूनी इमारत पाडताना त्यामध्ये असलेल्या गाळेधारकांना पुन्हा त्याच ठिकाणी गाळे देण्याचे ठरले होते. तसा ठरावही करण्यात आला होता. मात्र आज या ठरावाची पायमल्ली करण्यात येत आहे. जुन्या गाळेधारकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक व्यापा-यांना डावलून धनदांडग्यांना गाळे देण्याचा प्रयत्न केला गेल्यास शिवसेना गप बसणार नाही असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख सुनिल डुबळे यांनी दिला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलतांना सुनिल डुबळे म्हणाले की, ज्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांना लोकांनी निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींनी आपले अधिकार मुख्याधिका-याना दिले व मुख्याधिका-यानी कायद्याचा बडगा दाखवून व खोट्या भूलथापा देवून गाळे काढून घेतले. त्यानंतर गाळेधारकांना जी पर्यायी जागा दिली ती नादुरुस्त व गळकी होती. आज त्यांना लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तात्पूरते देण्यात आलेले गाळे खाली करण्याची अट घालण्यात आली आहे. व्यापा-यांचे शिष्टमंडळ ज्यावेळी आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांना भेटले त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिटींग घेऊन गाळेधारकांना राईट टू रिफ्यजलचा हक्क मिळवून दिला. यापूर्वी २००७ मध्ये आयडीएसएमटी मार्केट बाधंतेवेळी व्यापा-यांना असेच आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यांना हक्काचे गाळे आजपर्यंत देण्यात आले नाहीत. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी सदरचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती श्री.डुबळे यांनी दिली. तालुका संफ कार्यालयातील या पत्रकार परिषदेला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, डॅलिन डिसोजा, जिल्हा कार्यकारीणी सदस्य सचिन वालावलकर, शैलेश परुळकर, हेमंत मलबारी आदी उपस्थित होते.
