खारेपाटणमध्ये 3 ठिकाणी स्वतंत्र तपासणी;10 पथके केली तैनात
*⚡कणकवली ता.०५-:* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग दक्ष झाला असून आरोग्य विभागाची खारेपाटण चेकपोस्ट येथे 3 ठिकाणी 6 पथके, फोंडाघाट चेकपोस्ट येथे 2 आणि कणकवली रेल्वे स्टेशनवर 2 पथके अशाप्रकारे 10 पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असलेल्या चाकरमान्यांची कोविडच्या अनुषंगाने स्वब तपासणी आणि नोंद ठेवण्याकरिता खारेपाटण चेकपोस्ट, कणकवली रेल्वेस्टेशन आणि फोंडाघाट चेक पोस्ट या ठिकाणी आरोग्य विभागाने पथके तैनात करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. कणकवली रेल्वेस्टेशनवर सद्यस्थितीत मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची नोंद ठेवणे आणि ज्यांच्याकडे आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल नाही तसेच दोन डोस पूर्ण झाले नाही अशांचे आरटीपीसीआर स्वब घेण्यासाठी दोन पथके कार्यरत आहेत. तसेच त्याअनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तर खारेपाटण, फोंडा चेकपोस्टवरील पथके ही ६ सप्टेंबर रोजी ट्रायल बेसवर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबरपासून ही पथके ऍक्टिव्ह राहणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, खारेपाटण येथे ३ ठिकाणी ही पथके कार्यरत असणार आहेत. त्यात खारेपाटण चेकपोस्ट येथे कार आणि अन्य चारचाकीने मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची माहिती घेत निकष पूर्ण नसल्यास रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. मात्र, १८ वर्षाखालील आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल ७२ तासातील असल्यास अशा चाकरमान्यांची स्वब तपासणी केली जाणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, सद्यस्थितीत या पथकांकडून आरटीपीसीआर अहवालासाठी स्वाब घेण्यात येत आहे. चाकरमानी येण्याचे प्रमाण कमी असल्याने सध्या आरटीपीसीआरसाठी स्वब घेतले जात आहेत. पण गणेशोत्सवाच्यापूर्वी ६ सप्टेंबरपासून चाकरमान्यांचा जिल्ह्यात येण्याचा ओघ वाढणार असल्याने आरटीपीसीआरऐवजी रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. रॅपिड टेस्टकरिता आरोग्य विभागाकडे किटचा पुरेसा साठा उपलब्ध असून येत्या सोमवारी अजून रॅपिड टेस्टची किट उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
