कोरोना नियम पाळत गणेशोत्सव साजरा करा

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन

मालवण (प्रतिनिधी) कोरोना खबरदारी नियम व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाकडून जाणीवपुर्वक कोणत्याही प्रकारे कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही. मात्र मालवण नगरपालिका, पोलीस व प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचना आणि करण्यात आलेले नियोजन याची अंमलबजावणी प्रत्येकाने करावी, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे व मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. मालवण तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांच्यासह पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांनी नगरपालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार शहर वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच पार्किंगच्या ठिकाणी गाड्या उभ्या न करता अन्य ठिकाणी वाहतूक मार्गावर गाड्या उभ्या केल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भाविकांनी गणेशोत्सव उत्साहाने आणि आंनदात साजरा करावा. कोरोना नियमावलीचे भान प्रत्येकाने लक्षात ठेवावे. पारंपारिक स्वरूपात गणेश उत्सव साजरा करावा. मोठ्या स्वरूपात गर्दी होईल अश्या मिरवणुकांना बंदी आहे. घरगुती स्वरूपात अथवा काही शेजारी एकत्र येऊन घरगुती गणपती आगमन व विसर्जन करू शकतात. पारंपरिक वाद्याला परवानगी असेल. डीजे तसेच बंदी असलेल्या अन्य वाद्याना बंदी असल्याचे पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांनी स्पष्ट केले. व्यापारी वर्गाने आपली आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेवून गणेशोत्सवाचे नियोजन करावे. यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमनी गणेशभक्त मालवण तालुक्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येकाने उपययोजना करून दक्षता पाळली पाहिजे. शहरात आणि तालुक्यात सोमवारपासून गर्दी होण्याची शक्यत असल्याने त्या दृष्टीने नियोजन करा. असे यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले. व्यापारी संघातर्फे विजय केनवडेकर, रवी तळाशीलकर यांनी प्रशासनाकडे व्यापारी वर्गांसाठी लसीकरणाचा कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच रिक्षा संघटनांतर्फे पंकज मसुरकर यांनीही रिक्षा चालकांसाठी लसीकरणाचा कोटा उपलब्ध व्हावा असे सांगितले. यावर नगराध्यक्ष यांनी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र लस उपलब्ध होण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. वीज वितरण कंपनीने वसुलीची मोहिम थांबवून ज्या दुकान आणि घरांच्या तक्रारी आहेत तेथील वीज पुरवठा सकाळच्या सत्रात सुरू करावा, अशी मागणी व्यापारी बांधवांनी केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील, एस. एल. मांजरेकर, संजय नाईक, कैंसर पठाण, एसटी विभागाचे लिपीक विनोद शंकरदास, लक्ष्मण परब, सुधीर धुरी, उदय देसाई, दादा वाघ, दूरसंचार विभागाचे प्रविण कवडे, रोहित पाटकर, वीज वितरणचे जी. एस. साखरे, पंकज मसुरकर, रवींद्र तळाशिलकर, अरविंद सराफ आदी तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page