राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्गनगरी येथे ७ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण

*⚡सिंधुदुर्गनगरी ता ०३-:* राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत विकास आराखडा बाबत जिल्हास्तरावर शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे ७ सप्टेंबर २०२१ रोजी तांत्रिक छाननी समिती सदस्य, खातेप्रमुख, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील कार्यरत लेखाधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत ७ सप्टेंबर रोजी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे . “आमचा गाव आमचा विकास” उपक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचना व शासनाने वेळोवेळी शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या पूरक मार्गदर्शन सूचना विचारात घेऊन सन २०२२-२३ चा वार्षिक विकास आराखडा अंतिम करण्याबाबत सूचना आहेत. ग्रामपंचायत विकास आराखडे, मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया राबवून विहित मुदतीत पूर्ण करावयाच्या दृष्टीने केंद्र शासनाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही २ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीसाठी “सबको योजना सबका विकास” ही मोहीम जाहीर केलेली आहे. सन २०२२-२३ या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा निश्चित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा २ ऑक्टोबर २०२१ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत आयोजित करावयाच्या आहेत. तसेच् जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे विकास आराखडे विचारात घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व तालुके व जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करावयाचा आहे. यासंदर्भात या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. अशी माहिती ग्राम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page