कुडाळ माजी सभापती मोहन सावंत यांचा इशारा
*⚡सावंतवाडी ता.०२-:* शिरशिंगे-शिवापूर रस्त्याला येणाऱ्या वनसंज्ञेचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधकाम विभागाने एजन्सी नेमली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्ष रस्त्याला येणारी आडकाठी मिटण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या चार महीन्यात याबाबतचा निकाल नाही लागल्यास आंदोलनाची भुमिका घेतली जाईल. असा इशारा कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत यांनी दिला आहे. सावंतवाडी पंचायत समिती सभागृह मध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत सावंतवाडीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर, अनिल बांग, शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के आदी उपस्थित होते. श्री सावंत म्हणाले, गेली चार वर्ष शिरशिंगे-शिवापूर या रस्त्यासाठी दोन्ही गावातील पंचक्रोशीतील नागरिक लढा देत आहेत सावंतवाडी आणि कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा आठ किलोमीटरचा हा रस्ता आहे मात्र वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आठ किलोमीटर पैकी तीन किलोमीटरचा रस्ता हा वनसंज्ञा येत असल्याने रखडला होता. याबाबत वेळोवेळी बांधकाम विभागाला इशारा देऊनही काहीच हालचाली होत नसल्याने 18 जानेवारी 2019 रोजी पहिली आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. यावेळी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासित करतांना मंत्रालयात या संदर्भात बैठक घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार वन सचिव बांधकामचे अधिकारी वर्ग यांच्यासोबत मंत्रालयात बैठक पार पडली. त्यावेळी पाच महिन्यांमध्ये या संदर्भात योग्य तो निर्णय होईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही काहीच झाले नसल्याने आम्ही आमचा लढा तसाच पुढे सुरु ठेवला होता. अलीकडेच 15 ऑगस्ट रोजी ही आम्ही पुन्हा एकदा बांधकाम विभागाला इशारा दिल्यानंतर त्यासंदर्भात जागे झालेल्या अधिकाऱ्याने संबंधित वन सज्ञा व भूसंपादनाच्या प्रक्रियेत संदर्भात एजन्सी नेमण्यात आल्याचे पत्र आम्हाला दिले आहेत त्यामुळे चार महिन्यात हे काम मार्गी लागेल असा विश्वास आहे.
