वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात

कळसुली ग्रामस्थांच्यावतीने वनविभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन

*⚡कणकवली दि.३१-:* कणकवली तालुक्यातील कळसुली गावात बिबट्यांची दहशत तयार झाली आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल चार कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थही भयभीत झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कळसुली ग्रामस्थांच्यावतीने दिगवळे वनपाल तानाजी दळवी यांना निवेदन देण्यात आले. कळसुली येथे गेले काही महिने बिबट्याची दहशत तयार झाली आहे. गावातील दिंडवणेवाडी, सुद्रीकवाडी येथे बिबट्याने रात्रीच्या वेळी हल्ला करत पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. गेल्या महिन्यात दिंडवणे वाडी येथील अरविंद शिंदे यांच्या अंगणातील पाळीव कुत्र्याचा रात्रीच्या वेळी बिबट्याने फडशा पाडला होता. रविवार २९ आॕगस्ट रोजी पहाटे ३ च्या सुमारास सुद्रीकवाडी येथील नंदकिशोर सुद्रीक यांच्या अंगणातील पाळीव कुत्र्याची अशाचप्रकारे बिबट्याने शिकार केली होती. बिबट्याचा वावर असा दिवसेंदिवस वाढतच असल्याने गावातील ग्रामस्थही भीतीच्या छायेत वावरत आहेत. याकडे वनविभागाने गांभिर्याने लक्ष देऊन या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी कळसुली ग्रामस्थांच्यावतीने दिगवळे वनपाल तानाजी दळवी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी रुजाय फर्नांडिस, रोहन सुद्रीक, मधुसूदन सुद्रीक, नंदकिशोर सुद्रीक, प्रकाश दळवी तसेच कणकवली कार्यालयीन अधिकारी शिर्के आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page