शांताराम नाईक : गणेशोत्सवात घातलेले निर्बंध शिथील करावेत
*⚡बांदा दि.३०-:* मुंबई, पुणे, नागपूर येथे परराज्यातून प्रत्येक दिवशी तीन ते साडेतीन लाख प्रवासी ये-जा करतात. परंतु त्यांची साधी आरटीपीसीआर चाचणी होत नसून त्यांना सरळ घरी सोडले जाते. देशात सर्वत्र कोरोना संक्रमित असताना जन आशीर्वाद यात्रा, आंदोलने किंवा बैठकांसाठी कोकणात येणाऱ्यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली नाही. केवळ गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना चाचणी बंधनकारक का करण्यात आली? चाकरमान्यांवर लादलेली कोरोना टेस्ट अन्यायकारक असून ती रद्द करावी व गणेशोत्सवात घातलेले निर्बंध शिथील करावेत, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना मुंबई अध्यक्ष शांताराम नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. श्री.नाईक म्हणाले की, राज्यात लाखोंच्या संख्येने गर्दीच्या सभा, आंदोलने, जन आशीर्वाद यात्रा, पक्ष मेळावे, बैठका होत आहेत. त्यामुळे कोरोना नियमांची पायमल्ली होत असून सरकार उघड्या डोळ्यांनी कसे काय बघु शकते. येथे फक्त गुन्हा नोंदवायचा आणि सोडून द्यायचे हे कुठेतरी चुकत असून यावर योग्य विचार होणे गरजेचे आहे. एकंदरीत सरकारकडून चाकरमान्यांवर अन्याय आहे. कोरोना नियम पुढे करून फक्त कोकणालाच वेठीस धरून नियम कडक करू नका तर सर्वांना समान नियम लावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. कोकणवासीय गणपतीला गावी आले तर कोरोना जोरात पसरेल त्यावर मात करणे अशक्य होईल, असे संकेत कोरोनाने सरकारला दिले आहेत का? म्हणून राज्य सरकार फक्त कोकणवासियांना नियम कडक लावत आहे आणि असे असेल तर तसे जाहीर करावे. बाहेरून आलेले चालतील पण चाकरमानी कोकणात जाऊ नये असे सरकारला वाटते का? तसे नसल्यास सर्वांना समान कायदा, नियम, अटी लावा आणि गणेशोत्सवात घातलेले निर्बंध त्वरित शिथील करून गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करू द्या, असे आवाहनही शांताराम नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
