*⚡मालवण ता.३०-:* राज्य शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून कट्टा गुरामवाडी येथील प्रगतशील शेतकरी शेखर कुडाळकर यांच्या निवासस्थानी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. डॉ. विखे-पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रताप सलगर यांनी शेतीसाठी सेंद्रिय खतांचा योग्य वापर, खत तयार करण्याची पद्धत, सेंद्रिय खतांचे होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. पं. स. मालवणचे विस्तार अधिकारी जाधव यांनी गांडुळ युनिट व गांडुळ खत निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी गोसावी व कृषी सहाय्यक सौंगडे यांनी डॉ. विखे-पाटील यांचा जीवनपट व कृषी विभागातील त्यांचे उल्लेखनीय कार्य याची माहिती दिली, संतोष साटविलकर यांनी असे कार्यक्रम वारंवार होणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून सेंद्रिय खतांचा वापर करून तांत्रिकदृष्ट्या शेती करण्यास मदत होईल, असे सांगितले. महिलांना शेतीशाळा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी गोसावी, एस. जी. परब, डी. डी. गावडे, एम. बी. कदम, धुरी, विस्तार अधिकारी पाताडे, जाधव, उपसरपंच मकरंद सावंत, ग्रामसेवक पी. डी. सरमळकर, ग्रा.पं. सदस्या रुपाली परुळेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर कुडाळकर, विजय गोठणकर, विराज गोठणकर यांनी सहकार्य केले. आभार कृषीसेवक सौंगडे यांनी मानले.
कट्टा गुरामवाडी येथे शेतकरी दिन साजरा
