*⚡मालवण ता.२७-:* धुळे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे होणाऱ्या राज्य क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये १६ वर्षाखालील मुलांच्या संघासाठी मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या क्रिकेट नेट मधून आर्यन सारंग, हितेश मालंडकर व शौनक कांदळगावकर यांची तर १९ वर्षाखालील संघासाठी तन्वी सरकारे व अनुष्का आंबेरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे १६ वर्षखालील मुलांची निमंत्रित साखळी स्पर्धा व १९ वर्षाखालील मुलींची लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धा लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सावंतवाडी येथे निवड प्रक्रिया घेण्यात आली. या प्रक्रियेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी चार महिला खेळाडूंना निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चार खेळाडूंपैकी मालवणच्या दोन युवतींना संधी मिळाली आहे. या निवड प्रक्रियेमध्ये मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या क्रिकेट नेट मधून अनुष्का चंद्रशेखर आंबेरकर, तन्वी प्रसाद सरकारे, लिशा जयवंत सावंत या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये अनुष्का आंबेरकर, तन्वी सरकारे या धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या आहेत. तर मुलांच्या १६ वर्षाखालील जिल्ह्याच्या संघासाठी आर्यन सारंग, हितेश मालंडकर, शौनक कांदळगावकर या तिघांची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू मालवण मधील भंडारी हायस्कुलच्या क्रिकेट नेट मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या निवडमुळे खेळाडूंना जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या सर्वांना भंडारी हायस्कुल क्रिकेट नेटमधील प्रशिक्षक संदीप पेडणेकर, सुशील शेडगे, ज्ञानेश केळुसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
भंडारी हायस्कुलच्या क्रिकेट नेट मधून ५ खेळाडूंची जिल्हा संघासाठी निवड
