मनस्थिती बिघडलेल्या इसमाला दाखविली माणूसकीचा

नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेचे होतेय कौतुक

*⚡कणकवली ता.२६-:* नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेनं याचंच ‘जनसेवा हिच ईश्वरसेवा याचे एक उत्तम उदाहरण दाखवून दिलंय. मनस्थिती बिघडलेल्या एका इसमाला पुन्हा चांगल्या स्थितीत आणून त्यांनी समाजासमोर माणूसकीचा एक आदर्श प्रस्थापित केलाय. गेले काही दिवस कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे एक मानसिकरीत्या अस्थिर झालेला युवक फिरत होता. केस आणि दाढी वाढलेल्या स्थितीत तो इकडेतिकडे फिरायचा. हे दृष्टीस येताच नांदगाव येथील सन्मित्र रिक्षा संघटनेला ते पाहवलं नाही. संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येत त्या व्यक्तीला पुन्हा चांगल्या स्थितीत आणायचं ठरवलं. मग लागलीच या सत्कार्याला सुरुवात झाली. संघटनेच्या सदस्यांनी त्या व्यक्तीला स्वच्छ आंघोळ घातली. घालायला चांगले कपडे दिले. सलून व्यवसाय करणारे शैलेश टाकळे यांनी केस आणि दाढी करून दिल्यानंतर त्या इसमाचे रुपच पालटले. त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना झळकू लागली. माणसांत आल्याने त्याची मनस्थितीही काहीशी सुधरली. त्यानंतर त्याने आपले नाव, गाव, पत्ताही सांगितला. या इसमाचे नाव सागर दिगंऊ परब असे असून तो कुडाळ तालुक्यातील भरणी गावचा रहिवासी आहे. सन्मित्र रिक्षा संघटनेने दाखवलेल्या या मानवतेच्या कामाबद्दल संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सन्मित्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विलास कांडर, करीम बटवाले, नंदकिशोर मोरये, इक्बाल बटवाले, मंदार गुरव, बापार्डेकर, शैलेश टाकळे, चिके आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page