*⚡मालवण ता.२५-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटकेनंतर शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील बंगल्याच्या परिसरात अज्ञात व्यक्तिकडून फेकण्यात आलेल्या काचेच्या बाटल्या प्रकरणी बंगल्याच्या केअरटेकरने मालवण पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक होऊन रात्री जामीन मंजूर झाला होता. ना. राणे यांच्या अटकेच्या घटनेमुळे राज्यभर शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला होता. या वादाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उमटले. या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांच्या बंगल्याच्या परिसरात काल रात्रौ अज्ञातांनी काचेच्या बाटल्या फेकल्या होत्या या प्रकाराबाबत खास. राऊत यांच्या बंगल्याचे केअरटेकर रवींद्र भास्कर परब (रा. तळगाव) यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. काल मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने खास. राऊत यांच्या बंगल्याच्या आवारात सोड्याच्या तीन बॉटल फेकल्याचे परब यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर भा.द.वि. कलम ३३६ अन्वये व मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
खासदार राऊत यांच्या बंगल्यावर काचेच्या बाटल्या फेकल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
